आघाडीच्या बैठकीला सदस्यांचीच दांडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:22+5:302021-09-02T05:25:22+5:30
सातारा : सातारा पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीची बैठक बुधवारी दुपारी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात पार पडली. या ...

आघाडीच्या बैठकीला सदस्यांचीच दांडी!
सातारा : सातारा पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीची बैठक बुधवारी दुपारी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात पार पडली. या बैठकीला आघाडीच्या निम्म्या सदस्यांनी दांडी मारली. बैठकीत शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली.
कोरोना संक्रमणामुळे पालिकेच्या गेल्या दीड वर्षात केवळ तीनच सर्वसाधारण सभा झाल्या आहेत. वेळेवर सभा होत नसल्याने याचा सातारा शहराच्या विकासावर परिणाम होऊ लागला आहे. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीचा बिगुुल वाजताच पालिकेतील सत्ताधारी आघाडीने पुुन्हा एकदा विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कोट्यवधी रुपयांच्या ३०९ विषयांना मंजुरी देण्यात आली. आता शुक्रवार, दि. ३ रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून, अजेंड्यावर एकूण ५८ विषय घेण्यात आले आहेत.
या सभेच्या पार्श्वभूमीवर बुुधवारी दुपारी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात आघाडीतील सदस्यांची बैठक झाली. विरोधकांसह आघाडीतील सदस्यही अनेक विषयांवर सभेत आक्षेप नोंदवितात, हा आजवरचा इतिहास आहे. हे लक्षात घेऊन अडचणीचे विषय कोणते आहेत किंवा नाही, यावरही बैठकीत खलबते झाली. ज्या विषयांना अधिक विरोध होऊ शकतो, असे आरोग्य विभागाचे काही विषय ऐनवेळी तहकूब केले जाऊ शकतात. दरम्यान, गुरुवार पेठेतील गाळ्यांच्या विषयावरदेखील सभेत वादळी चर्चा होऊ शकते. ऑनलाईन सभेत सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये वाक्युध्द रंगते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोगो : सातारा पालिका