नेत्यांनो, पुढच्या पिढीला काय उत्तर द्याल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:20+5:302021-02-05T09:08:20+5:30
सातारा : ‘मराठा समाजातील लोकांना प्रत्येक ठिकाणी मानहानीला सामोरे जावे लागत आहे. आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातील लोकांना गुणवत्ता ...

नेत्यांनो, पुढच्या पिढीला काय उत्तर द्याल!
सातारा : ‘मराठा समाजातील लोकांना प्रत्येक ठिकाणी मानहानीला सामोरे जावे लागत आहे. आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातील लोकांना गुणवत्ता असूनही शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवत असताना तसेच नोकऱ्या मिळवताना आणि पदोन्नती होताना मानहानी सोसावी लागते. राजकारणाचं गजकर्ण झाले, आज तुम्ही आमदार-खासदार आहात. पुढच्या पिढीला काय उत्तर देणार आहात? मराठा समाजातील लोकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही,’असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले फाउंडेशनचे चेअरमन नरेंद्र पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, ‘प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात मराठा समाज आहे. या समाजाबद्दल संबंधित आमदारांना काहीच वाटत नाही का. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली असताना महाराष्ट्र सरकारचा वकील जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आणि होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहत नाही. चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश करत असताना व सरकारी नोकरी लागण्यापूर्वी गुणवत्ता तपासली जाते. तेव्हा आरक्षण असणारे लोक निम्मे मार्क्स असतील तरीदेखील मराठा समाजाला मला बाजूला ठेवून त्यांची निवड केली जाते. हा मराठा समाजावर अन्याय आहे. हा अन्याय अजून किती दिवस सुरू ठेवला जाणार आहे? आम्ही दुसऱ्याचं आरक्षण काढून आम्हाला द्या, अशी मागणी करत नाही. आज मराठा समाजाकडे शेतजमीन राहिलेली नाही. गावात मजुरीवर जाण्याची वेळ अनेक लोकांवर आलेली आहे. नेतेमंडळींनी आरक्षणाच्या प्रश्नावर पक्ष बाजूला ठेवून निर्णय घ्यावा. पुढची पिढी आपल्याकडे अपेक्षेने बघत आहे.’
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘आरक्षणामध्ये राजकारण केले जाऊ नये. मराठा समाजाने आता एकत्र येणे गरजेचे आहे. आरक्षणासाठी मराठा समाज वंचित राहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत
राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त केलं ते अपेक्षितच होतं
दरम्यान, या कार्यक्रमामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आर्थिक मदत घेऊन उद्योग-व्यवसायात देदीप्यमान कामगिरी केलेल्या व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला.
तिन्ही राजेंनी सरकारला दणका द्यावा
मराठा समाज राजकारणात गुंतलेला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा निवडणुकांमध्ये गुंतलेले नेते मराठा समाजाच्या हितासाठी लढत नाहीत. सत्ता काही आयुष्यभर टिकत नसते, सरकार बदलत राहतात. आता उदयनराजे, संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या तिन्ही तिघांनी मिळून सरकारला आरक्षण प्रश्नावर धक्का द्यावा, अशी इच्छा नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
पाटील म्हणाले... उदयनराजे यांचा विजय असो!
लोकसभेची निवडणूक काही वर्षांपूर्वी एकमेकांच्या विरोधात लढलेले उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील हे मराठा समाजाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते. उदयनराजे यांचे भाषण सुरू होणार होतं, तेवढ्यात नरेंद्र पाटील यांनी ‘उदयनराजे यांचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. त्याच वेळी शिवेंद्रसिंहराजेदेखील व्यासपीठावर उभे होते. कुणीच कायमचा शत्रू नसतो हेदेखील या निमित्ताने पाहायला मिळाले. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेत्यांचे संघटनदेखील होऊ लागलेले आहे.