बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांचा कस!

By Admin | Updated: July 16, 2015 20:43 IST2015-07-16T20:43:34+5:302015-07-16T20:43:34+5:30

देसाई-पाटणकर गटांत लढत : नवीन वॉर्डरचनेमुळे सदस्यसंख्याही वाढणार

Leaders to prevent rebellion! | बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांचा कस!

बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांचा कस!

तारळे : पाटण तालुक्याचे लक्ष लागलेल्या तारळे ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ येऊ लागली आहे. गावातील राजकीय वातावरणही त्यामुळे ढवळून निघत आहे. अनेक ठिकाणी एका जागेसाठी अनेकजण इच्छुक असल्याने नाराजी दूर करीत बंडखोरी टाळून सक्षम उमेदवार निवडण्यासाठी नेतेमंडळींचा कस लागत आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून माघारी घेईपर्यंत ‘कोण कितने पानी में’ हे सांगणे मुश्किल झाले आहे. तालुक्याच्या राजकारणात एक संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून तारळे ग्रामपंचायत ओळखली जाते. तारळे गावाला देसाई गटाचा बालेकिल्ला समजला जात असताना गतवेळी पाटणकर गटाने ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांनी ताबा घेतला. देसाई-पाटणकर गटांत सरळ लढत होत आहे. गतवेळी पाटणकर गटाबरोबर असलेला एक गट देसाई गटात दाखल झाल्याने सत्ता अबाधित राखण्यासाठी पाटणकर गट तर सत्तेच्या चाव्या पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी दोन्ही गटांकडून वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. एकूण पाच वॉर्ड मिळून पंधरा ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत यंदा एक नवीन वॉर्ड तयार झाला आहे. त्याठिकाणी दोन सदस्य संख्या वाढल्याने आत एकूण सतरा सदस्यांची संख्या ग्रामपंचायतीवर होणार आहे. काही ठिकाणी वॉर्डरचनेत कोणाला फायदा, कोणाला तोटा होतो, याचे चित्र काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. उमेदवार चाचपणी, इच्छुकांची माहिती घेण्यासाठी गुप्त बैठका होऊ लागल्या आहेत. कोणाचे कुठे व किती वजन आहे. याची शहानिशा करून उमेदवारी चाचपणी करण्यात येत आहे. तसेच इच्छुकांची संख्या वाढत असल्याने एकमेकांची समजूत काढणे नेते मंडळींची डोकेदुखी ठरणार आहे.
एकदम अटीतटीच्या होणाऱ्या लढतीत दोन्ही गटांकडून ग्रामपंचायतीवर आपलाच ताबा असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी अर्ज भरण्याची मुदत आली तरी उमेदवारीचा घोळ मिटताना दिसत नाही. एका जागेवर एका पेक्षा जास्त उमेदवार दावा सांगत असल्याने नाराजांची नाराजी दूर करून बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी नेतेमंडळी सावध पावले टाकत आहेत.
निवडणूक प्रचारात पाटणकर गटाकडून विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात येईल, तर देसाई गटाकडून मात्र पाटणकर गटाने विरोधात असताना केलेल्या आश्वासनांची पूर्तता या पाच वर्षांत केली का? हा मुख्य मुद्दा उपस्थित करणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. यासह अनेक मुद्द्यांवर ग्रामपंचायतीचा प्रचार रंगणार आहे. देसाई-पाटणकर गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून, मतदारच कोणाची जागा कुठे आहे, हे दाखवून देणार आहेत. कोणी कितीही उर बडवला तरी थोड्याच दिवसात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. (वार्ताहर)

बेरजेचे राजकारण...
वॉर्डावॉर्डातून गुप्त बैठका घेऊन मतदारांचे कौल, उमेदवारांची चाचणी सुरू आहे. यंदाची निवडणूक म्हणावी एवढी सोपी नसल्याने गावातील नेतेमंडळी बरोबरच वरिष्ठ नेत्यांनी सुध्दा तारळे ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालून बेरजेची गणिते आखली आहेत.

Web Title: Leaders to prevent rebellion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.