नेते घरात, धरणग्रस्त मात्र ऊन्हात
By Admin | Updated: May 12, 2015 23:41 IST2015-05-12T21:55:14+5:302015-05-12T23:41:33+5:30
वयोवृद्ध आंदोलकांचे सुरू आहेत हाल : कुडकुडत काढली शनिवारची संपूर्ण रात्र

नेते घरात, धरणग्रस्त मात्र ऊन्हात
सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन संदर्भातील मागण्यांसाठी जिल्ह्यातील धरणग्रस्तांनी ६ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रविवारी आंदोलनाच्या ३५ व्या दिवसांपर्यंत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. वयोवृद्ध धरणग्रस्तांचे आंदोलनस्थळी प्रचंड हाल सुरू
आहेत. अंगाची लाहीलाही करणारे ऊन, तर अधूनमधून विजेच्या कडकडाटासह येणारा जीवघेणा पाऊस धरणग्रस्तांना मरणाच्या दारात उभा करीत आहे. शासनकर्ते मंत्रालयात, धरणग्रस्तांचे नेते घरात, तर बिचारे धरणग्रस्त मात्र आंदोलनस्थळी ऊन-पावसात रात्री जागून काढीत आहेत.
राज्यातील सुमारे ११ तालुक्यांमधील धरणग्रस्तांचे विविध ठिकाणी गेल्या ३५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढेही जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० धरणग्रस्त श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनासाठी बसले असून, त्यात वयोवृद्ध, पुरुष व महिलांचा समावेश आहे.
पुनर्वसनासंदर्भातील दीर्घ काळापासूनच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन सुरू असून, शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले होते. राज्यात इतर ठिकाणी सुद्धा याचप्रकारे युती शासनातील मंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन दिले. मात्र, आजअखेर मुख्यमंत्र्यासमवेत बैठक झाली नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही धरणग्रस्तांच्या अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांपुढे आंदोलनांशिवाय दूसरा पर्याय ऊरलेला नाही.
धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे शासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात असला तरी शासनकर्त्यांवर त्याचा काहीही व कोणताही परिणाम
होताना सध्यातरी दिसत नाही. (प्रतिनिधी)
धरणग्रस्तांना किती दिवस वेठीस धरणार?
धरणग्रस्तांच्या हितासाठीच हे आंदोलन सुरु असले तरी वयोवृद्ध धरणग्रस्तांना किती दिवस वेठीस धरणार असा सवाल जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे. शनिवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने पोटात भीतीचा गोळा यावा, अशी भयानक परिस्थिती निर्माण केली होती.
केवळ रस्त्यावर अडकलेल्यांच्याच नव्हे तर घरात असणाऱ्या नागरिकांच्याही अंगावर काटा उभा राहिला होता. अशा परिस्थितीत धरणग्रस्त मात्र आंदोलनस्थळी बसून होते. मध्यरात्रीपर्यंत विजेचे लोळ, आकाशात दिसत होते. पाऊस सुद्धा सुरू होता.
अशा भीतीदायक वातावरणात धरणग्रस्तांनी आंदोलनस्थळी कुडकुडत रात्र काढली. ज्यांनी न्याय द्यायचा ती राज्यकर्ती मंडळी मंत्रालयात किंवा त्यांच्या अलिशान निवासस्थानी बसून असतील. धरणग्रस्तांचे नेते सुद्धा त्यांच्या घरात बसून राहतात.
धरणग्रस्तांसमवेत त्यांनी एखादी रात्र, आंदोलनस्थळी बसून कधीही काढल्याचे ऐकीवात नाही. धरणग्रस्तांना मात्र ऊन-पावसात जीव मुठीत घेऊन आंदोलनस्थळी दिवस ढकलावे लागत आहे.ं