गावोगावी राजकीय डावपेचांची आखणी
By Admin | Updated: April 15, 2015 23:57 IST2015-04-15T23:03:16+5:302015-04-15T23:57:56+5:30
कातरखटाव गटात राजकीय वारे : निवडणुका लांबल्यामुळे गावपुढाऱ्यांना दिलासा

गावोगावी राजकीय डावपेचांची आखणी
कातरखटाव : कातरखटाव व परिसरातील कोणतीही प्राथमिक तयारी नसताना ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख तोंडावर येऊन आदळल्याने गांगरून गेलेल्या गाव कारभाऱ्यांना निवडणुका पुढे गेल्यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरीत काळात डावपेच आखून निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचे बेत गावोगावचे गावकारभारी आखत आहेत. जून-जुलैमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे रणागंण आतापासून तापवायला सुरुवात झाली आहे. कातरखटाव गटातील कातरखटावसह, बोंबाळे, दाळमोडी, एनकूळ, कणसेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, येरळवाडी, डाभेंवाडी या सर्व ग्रामपंयतींच्या निवडणुका अपेक्षित आहेत. अशा परिस्थितीत अद्याप सरपंचपदाचे आरक्षण निघाले नव्हते. गाव कारभारी सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष देऊन होते.
अशातच पंधरा दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला झाला आहे. या पार्श्वभूमीवर गाफील असलेले गाव कारभारी अक्षरश: गांगरून गेले होते. अजून प्रभागाच्या मतदार याद्या हाताशी नाहीत, उमेदवाराचा पत्ता नाही, आघाडी-बिघाडीची बोलणी नाही, कसलीही प्राथमिक स्वरूपाची तयारी नाही. संभाव्य उमेदवाराचे दाखले, सरकारी देणी, विविध संस्थांकडील दाखले नाहीत आणि अशातच सर्व जागांवर योग्य उमेदवार देऊन ते निवडून आणण्याचे दिव्यसंकट समोर उभे राहिले होते.
आता निवडणुका नजरेच्या अचूक टप्प्यापर्यंत दूर गेल्यामुळे गावकारभाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या सत्तेपर्यंत उडी मारण्यासाठी आता गावकारभाऱ्यांना मागे सरण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा फड चांगलाच रंगणार, हे आताच स्पष्ट दिसून येत आहे. (वार्ताहर)
पुढाऱ्यांची प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी
कुणाला राम राम, कुणाला सलाम, कुणाला जयभीम, तर कुणाला जय महाराष्ट्र, असे नमस्काराचे वेगवेगळे प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. लग्न, सोळावा, मुंज, देवदेव, कोणी आजारी पडले तर त्या ठिकाणी हजेरी, आर्थिक सहकार्याची तयारी, असे वेगवेगळे प्रयोग करून मतदार आपल्या बाजूने कसा वळवता येईल, त्या दृष्टीने पुढाऱ्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत.
कातरखटाव गटात गावपुढारी उदंड
कातरखटाव गटात राजकीय विचार केला तर ‘‘लेकुरे उदंड झाली, या नाटकाप्रमाणे ‘ढिगभर नेते आहेत. ऐन उन्हाळ्यात निवडणुका लागल्यामुळे पाणीप्रश्न चांगलाच पेटणार आहे. गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकामध्ये आमदार जयकुमार गोरे गट, शेखर गोरे गट, आमदार प्रभाकर घार्गे गट, सर्व पक्षांचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत हे नक्की.