लक्ष्मी गायीचा कोकणापर्यंत दबदबा----ही रानवाट वेगळी
By Admin | Updated: January 11, 2016 00:49 IST2016-01-10T22:55:46+5:302016-01-11T00:49:46+5:30
खातगुणच्या सुबोध जाधव यांची कामधेनू

लक्ष्मी गायीचा कोकणापर्यंत दबदबा----ही रानवाट वेगळी
खटाव तालुक्यातील खातगुण येथील शेतकरी सुबोध प्रभाकर जाधव यांच्याकडे असलेल्या चार वर्षीय लक्ष्मी देशी गायीने आत्तापर्यंत सातारा जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेरही भरणाऱ्या जनावरांच्या प्रदर्शनात ‘उत्कृष्ट कामधेनू प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळविले आहे.कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद , सिंधुदुर्ग सिंधू कृषी औद्योगिक, पशुपक्षी, मत्स्य व्यवसाय प्रदर्शन व पर्यटन मेळा सन २०१५ या मध्ये उत्कृष्ट देशी गायीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. या प्रदर्शनात सर्व जातींच्या एकूण १२० गायी सहभागी करण्यात आल्या होत्या. या व्यतिरिक्त या गायीला कण्हेरीमठ येथे सलग तीन वर्षे ‘कामधेनू’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच कऱ्हाडमधील यशवंत कृषी प्रदर्शनात सलग तीन वर्षे पुरस्कार मिळविला आहे. पुसेगाव येथील खिलार जनावरांच्या प्रदर्शनात सलग दोन वेळा पुरस्कार मिळाला आहे. मावळ येथील जाणता राजा कृषी प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचा तर माणदेशी महोत्सवात प्रथम क्रमांक मिळविला आहे. एक प्रगतिशील शेतकरी सुबोध जाधव यांनी या गायीची अत्यंत सुदररीत्या निगा राखवी आहे. गोमुत्र तसेच शेणाचा वापर करून पिके घेतली जात आहेत.
अवघी आठ महिन्यांचे असताना पुसेगाव यात्रेत भरणाऱ्या खिलार जनावरांच्या प्रदर्शनात वासरू घेतले होते. या गायीने गेल्या दोन महिन्यांपूर्वी एकावेळी दोन वासरांना जन्म दिला आहे. देशी गायींची संख्या रोडावत आहे. परंतु देशी गायीचे गोमुत्र तसेच शेण आज शेतीसाठी तसेच पिकाला उत्तम आहे. बरेच शेतकरी गायीला पाहण्यासाठी येतात तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या घरी गाय असावी, असे वाटू लागले आहे.
- सुबोध जाधव, शेतकरी