सासरचं धोतंर, माहेरचं लुगडं कालबाह्य होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:13 IST2017-07-22T15:13:26+5:302017-07-22T15:13:26+5:30
धोतर नेसणाऱ्याची संख्या अत्यल्प,ग्रामीण भागातच घडतंय दर्शन

सासरचं धोतंर, माहेरचं लुगडं कालबाह्य होण्याच्या मार्गावर
आॅनलाईन लोकमत
औंध (जि. सातारा), दि. २२ : धोतर व लुगडं म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ती महाराष्ट्रातील मराठमोळी जोडी आणि त्यांचा भारदस्त पेहराव. या वेशभूषेला देशभरात अनन्यसाधारण महत्त्व असून भारतीय संस्कृतीत हा पारंपरिक वस्त्रप्रकार आहे. परंतु सध्या बदलत्या व फॅशनच्या युगात हा वस्त्रप्रकार कालबाह्य होण्याच्या मार्गावर असून येणाऱ्या पिढीस सासरच धोतर व माहेरची साडी (लुगडं)हे चित्रपटातच पहावयास मिळणार, अशी परिस्थिती सध्या निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.
शहरी भागात धोतर वापरणाऱ्यांची संख्या बोटावर मोजावे इतकी असून ग्रामीण भागात ही तुरळक प्रमाणात जुनी मंडळी धोतर परिधान करतायत. मात्र तेही कुठेतरीच. धोतराची लांबी ४.५मीटर इतकी असून कमरेभोवती गुंडाळून पायातून लपेटून घेऊन कमरेपाशी गाठ देऊन ते नेसले जाते.
स्वातंत्र्याच्या कालखंडात खादी गांधी टोपी, नेहरू शर्ट किंवा कुर्ता व त्यावर धोतर परिधान करण्याची एक पोशाख पद्धत होती. आजही अनेक नेत्यांच्या अंगावर हा पोशाख दिसून येतो. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी म्हणजे पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण हेही मोठया आवडीने धोतर घालत असत तसेच अलीकडेच म्हटले तर आण्णा हजारे, हरिभाऊ बागडे,सातारा- सांगली विधानपरिषदेचे आ.मोहनराव कदम हेही आपणास धोतराच्या पोशाखात दिसत आहेत.
अलीकडे शहरी व ग्रामीण भागात वयोवृध्द तसेच सत्तरी गाठलेले देखील धोतर ऐवजी नाईट पँटीत व टी-शर्ट मध्ये दिसत आहेत.