कृत्रिम तळं हवंय तीस वर्षांसाठी
By Admin | Updated: November 11, 2015 00:15 IST2015-11-10T22:16:40+5:302015-11-11T00:15:07+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : विसर्जनचा खर्च टाळण्यासाठी आत्तापासूनच हालचाली

कृत्रिम तळं हवंय तीस वर्षांसाठी
सातारा : दरवर्षी मंगळवार तळे आणि मोती तळ्यात गणेश विजर्सन केले जात होते. विसर्जनानंतर तळ्यातील गाळ काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागत होता. त्यामुळे शहरातील ऐतिहासिक तळ्यांची दयनीय अवस्था झाली होती. यंदा मात्र, दोन्ही तळ्यांमध्ये विसर्जन न करता पालिकेने कृत्रिम तलाव तयार करून ऐतिहासिक वारसा जपला; परंतु कृत्रिम तळ्याची जागा जिल्हा परिषदेची असल्याने दरवर्षी याच ठिकाणी गणेश विसर्जन व्हावं, यासाठी पालिकेने आत्तापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत.
सातारा शहरात यंदा प्रथमच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन पार पडले. राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती फार्म येथे जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा आहे. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिकेला विसर्जन कालावधीसाठी काही अटींवर मिळाली होती. पालिकेनेही या जागेवर उत्कृष्ठ असा कृत्रिम तलाव तयार करून विसर्जनची सोय केली. शहरातील सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मूर्तींचे विसर्जन केले. हा कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी पालिकेला लाखो रुपये खर्च आला. दरवर्षी याच तळ्यामध्ये विसर्जनला परवानगी मिळाली तर पालिकेचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे आत्तापासून पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.
हेच कृत्रिम तळे पालिकेला तीस वर्षांसाठी दिले तर कायमस्वरूपी विसर्जनाची सोय होईल. शिवाय दरवर्षी कृत्रिम तळे तयार करण्यासाठी होणारा खर्चाची बचत होईल, या हेतूने पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी कृृत्रिम तलाव तयार करण्यास पालिका तयार आहे. १०० बाय १०० मीटर जागा पालिकेला आवश्यक असून, या जागेवर शासनाची मालकी राहील तसेच देखभाल दुरुस्तीसाठी तीस वर्षांच्या मुदतीत पालिकेला ही जागा उपलब्ध करून द्यावी. या ठिकाणी पालिकेमार्फत कृत्रिम तलावाबरोबरच तलावाच्या परिसराचे सुशोभीकरण करून सुंदर असा परिसर विकसित करण्यात येईल. तरी ही जागा पालिकेला उपलब्ध करून द्यावी, अशा स्वरूपाचे पत्र नूतन नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. (प्रतिनिधी)
विसर्जनासाठी दरवर्षी खर्च करण्यापेक्षा प्रतापसिंह शेती फार्म येथील जागा कायमस्वरूपी मिळाल्यास पालिकेचा खर्चही वाचेल. शिवाय नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याची सवय लागेल.
- विजय बडेकर, नगराध्यक्ष, सातारा