साश्रुनयनांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप

By Admin | Updated: April 24, 2016 00:22 IST2016-04-24T00:22:59+5:302016-04-24T00:22:59+5:30

डिस्कळमध्ये अंत्यविधी : घाडगे कुटुंबासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा

Last reply to Veerpooten | साश्रुनयनांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप

साश्रुनयनांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप

बुध : खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील जवान तुषार तानाजी घाडगे हे बिकानेर येथे कर्तव्य बजावत असताना एका स्फोटात गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी तुषार यांचे पार्थिव डिस्कळ येथे आणण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जमला होता. भावूक वातावरणात जवान तुषार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ बंधू दादासाहेब घाडगे यांनी मुखाग्नी दिला.
दिल्लीवरून खास विमानाने तुषार यांचे पार्थिव शनिवारी सकाळी पुण्याला आले. याठिकाणी लष्कराच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता लष्कराच्या रुग्णवाहिकेतून तुषार यांचे पार्थिव डिस्कळ येथे आणण्यात आले.
जवान तुषार यांच्या पत्नी पूनम यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आपल्या मुलाला पाहून आई कमलाबाई यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. तुषार यांची मुलगी श्रुती आणि एक वर्षाचा मुलगा श्रेयस यांना आपल्या वडिलांना काय झाले, हे कळत नव्हते. वडील तानाजीराव हे आपले सारे दु:ख गिळून सर्वांना आधार देत होते; पण त्यांनाही हुंदका आवरता आला नाही.
वीर जवान तुषार यांच्या पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या गाडीतून गावातून मिरवणूक काढण्यात आली. ‘वीर जवान तुषार अमरे रहे, भारत माता की जय’ या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता़ डिस्कळसह मोळ, मांजरवाडी, काळेवाडी, गारवडी, चिंचणी, ललगुण या गावात शनिवारी चूल पेटली नाही. या सर्व गावांतील पुरूष, महिला, अगदी लहान मुलांनीही तुषार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत गर्दी केली होती.
लष्कराच्या वतीने सुभेदार वाडेकर, सुभेदार चव्हाण यांनी वीर जवान तुषार यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले़ तुषार यांचे ज्येष्ठ बंधू दादासाहेब यांनी तुषार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला़
यावेळी तहसीलदार सुधाकर धार्इंजे, पुसेगावचे पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे, माजी सभापती डॉ. सुरेश जाधव, सरपंच अर्चना शिंदे, पंचायत समिती सदस्य दीपाली गोडसे, महेश
पवार, तानाजी पवार, अमोल गोडसे, प्रदीप गोडसे, विनायक काळे आणि डिस्कळसह परिसरातील गावांतील सर्व नागरिक उपस्थित होते.
पुन्हा आठवला तो दिवस
आठ वर्षांपूर्वी डिस्कळ गावचे सुपुत्र लालासाहेब गोडसे हे शहीद झाले. त्यानंतर पुन्हा येथील जवान तुषार घाडगे यांच्याबाबतीत ही दुर्दैवी घटना घडल्याने नागरिकांना पुन्हा तो दिवस आठवला.
सुटी मिळाली असती तऱ.़..
आपल्या बहिणीच्या लग्नासाठी सुटी मिळाली असती, तर वीर जवान तुषार यांच्यावर ही वेळ ओढावली नसती पण़.़. नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
मुलाच्या वाढदिवसाला येणार होते पण...
गेल्या आठवड्यात तुषार यांचा मुलगा श्रेयस याचा पहिला वाढदिवस होता; पण स्फोटात जखमी झाल्याने तुषार यांच्यावर उपचार चालू असल्याने त्यांना गावी येता आले नाही. आपल्या मुलाला वाढदिवसाची भेट न देताच वीरपुत्र कायमचा निघून गेला.

Web Title: Last reply to Veerpooten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.