सातारा हद्दवाढ अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: April 2, 2016 00:53 IST2016-04-02T00:53:26+5:302016-04-02T00:53:46+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक अभिप्राय : पाच ग्रामपंचायती समाविष्ट होणार

सातारा हद्दवाढ अंतिम टप्प्यात
सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीचा निर्णय लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव मंत्रालयात अंतिम निर्णयाला आला असून केवळ आता ग्रामविकास खात्याच्या अभिप्रायाचे पत्र मिळाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या हद्दवाढीबाबतचा सकारात्मक अभिप्राय दिल्यामुळे स्थानिक पातळीवर पूर्णपणे ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.
प्रस्तावित हद्दवाढीनुसार शाहूपुरी, दरे, शाहूनगर, संभाजीनगर, खेड ग्रामपंचायतीचा महामार्गाच्या अलीकडील शहरालगतचा भाग, समर्थनगर हा संपूर्ण परिसर हद्दवाढीनंतर सातारा शहरात समाविष्ट होणार आहे. सातारा नगरपालिकेची सदस्य संख्या ३९ आहे. ती वाढून ६५ इतकी होऊ शकते.
२००१ मध्ये पालिकेने हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव तयार केला. त्याला मंजुरी देऊन हरकतीही मागविल्या होत्या. बहुतांश हरकती या करवाढ होईल या भीतीपोटी होत्या. हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. आता मात्र शहरात झपाट्याने झालेली सुधारणा लक्षात येण्यासारखी असल्याने लोकांचा विरोध पाहायला मिळत नाही. शहर वगळता इतर भागात कचरा डेपोची गंभीर समस्या आहे. लगतच्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजना चालवणे शक्य नाही. शहरात समावेश झाल्यानंतर राजकीय महत्त्व कमी होण्याची चिंता मात्र अनेकांना होती आणि अजूनही आहे.
ग्रामविकास खात्याच्या अभिप्रायासाठी हालचाली
सातारा पंचायत समिती व जिल्हा परिषदेत हद्दवाढीच्या बाजूने ठराव मंजूर झाले आहेत. हद्दवाढीचा प्रस्ताव मंत्रालयात पोहोचला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही आपल्या सकारात्मक अभिप्राय कळविला आहे. आता जिल्हा परिषदेच्या ठरावावर अंतीम अभिप्राय ग्रामविकास खात्याकडून नगरविकास विभागाकडे गेल्यानंतर अधिकृत शिक्कामोर्तब होईल.