सातारा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: April 13, 2016 23:33 IST2016-04-13T21:36:52+5:302016-04-13T23:33:04+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले : मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

सातारा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात
सातारा : ‘सातारा शहरालगत असलेल्या उपनगरांचा झपाट्याने विस्तार होत आहे. प्रलंबित असणारा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाच्या सचिवांशी चर्चा केल्यानंतर शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. आता हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे,’ अशी माहिती
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पाहिजे त्या प्रमाणात उपनगरांचा विकास होत नसल्याने लाखो नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सातारा पालिकेच्या माध्यमातून शहरात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यांसह सर्व प्रकारच्या दर्जेदार सोयी-सुविधा पुरवल्या गेल्या असून, शहराचा कायापालट होत आहे. शहराच्या मानाने उपनगरांच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. उपनगरांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपनगरांचा समावेश पालिका हद्दीत होणे आवश्यक आहे. यासाठी सातारा पालिकेमार्फत राज्याच्या नगरविकास विभागाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाच्या सचिवांशी चर्चा केल्यानंतर शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. यामुळे हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्पयात आला असून, लवकरच प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा
आहे.
अनेक वर्षांपासून हद्दवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. उपनगरांचा झपाट्याने विस्तार झाला आहे. मात्र उपनगरांमध्ये समस्या सातत्याने भेडसावत आहेत. उपनगरांच्या विकासासाठी भरीव निधी मिळत नाही. उपनगरांसह शहरालगत असलेल्या करंजे, खेड, दरे खुर्द, कोडोली, गोडोली, विलासपूर, संभाजीनगर आदी गावांना बाजारहाट, आरोग्य, दळणवळ आदी बाबींसाठी सातारा शहरावरच अवलंबून राहावे लागते. (प्रतिनिधी)
काही दिवसांत प्रस्ताव मंजूर..
हद्दवाढ प्रस्तावानुसार सातारा शहरालगतच्या प्रस्तावित हद्दवाढ क्षेत्रामध्ये नियोजनबद्धरीत्या नियंत्रित विकास होण्याच्या दृष्टीने या हद्दवाढ प्रस्तावास त्वरित मान्यता मिळणे आवश्यक आहे. लवकरात लवकर हद्दवाढ झाली तरच सातारा शहराप्रमाणे उपनगरांचाही कायापालट होणार आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून हद्दवाढीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यासाठी आपण प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. येत्या काही दिवसांत हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.