शुक्रवार पेठेतील जलशुद्धिकरण केंद्र मोजतेय अखेरची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:41 IST2021-08-26T04:41:56+5:302021-08-26T04:41:56+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड शहराला कोयना नदीवरून पाणी पुरवठा करणारी योजना १९१७ साली सुरू झाली. या केंद्रातून २०१७ पर्यंत पाणीपुरवठा ...

The last factor is measuring the water purification center in Pethe on Friday | शुक्रवार पेठेतील जलशुद्धिकरण केंद्र मोजतेय अखेरची घटका

शुक्रवार पेठेतील जलशुद्धिकरण केंद्र मोजतेय अखेरची घटका

कऱ्हाड : कऱ्हाड शहराला कोयना नदीवरून पाणी पुरवठा करणारी योजना १९१७ साली सुरू झाली. या केंद्रातून २०१७ पर्यंत पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर पंकज हॉटेललगतच्या नव्या जलशुद्धिकरण केंद्रातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तेव्हापासून शुक्रवार पेठेतील जलशुद्धिकरण केंद्र बंद करण्यात आले असून, पालिकेने व स्थानिक नगरसेवकांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने हे केंद्र दारुडे, व्यसनी लोकांच्या विळख्यात गेले आहे. संतापजनक बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांत लाखो रुपयांचे भंगार या केंद्रातून चोरीस गेले आहे. याची फिकीर पालिकेला आणि नगरसेवकांनाही नाही. त्यामुळे येथील संतप्त रहिवासी पालिकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

शुक्रवार पेठेतील जलशुद्धिकरण केंद्र १९१७ पासून कार्यान्वित करण्यात आले. या ठिकाणी ब्रिटिशकालीन इमारत असून अधिकाऱ्यांना वास्तव्यासाठी निवासस्थाने आहेत. पाण्याच्या टाक्या व पाणी स्वच्छतेची मशिनरी या ठिकाणी आहे. येथून शुक्रवार, रविवार पेठांसह काही भागांना पाणीपुरवठा होत होता. नदीकाठी असणाऱ्या या केंद्रात २०१७ पर्यंत पालिकेकडून कंत्राटी कर्मचारी तैनात होते. पाणीपुरवठ्यासह या केंद्रात येथील कर्मचाऱ्यांनी फुलबाग फुलवली होती. मात्र हे केंद्र बंद करण्याचा निर्णय शंभराव्या वर्षातच घेण्यात आला. येथील कर्मचारी नव्या केंद्रात हलविण्यात आले. तेव्हापासून या केंद्राला घरघर लागली आहे.

दारूडे, व्यसनी लोकांनी या केंद्राच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणाचा गैरफायदा घेत येथे आपला ठिय्या केला आहे. त्यातच कोणाचेही लक्ष नसल्याने हळूहळू येथील लोखंडी साहित्य लंपास करण्यास सुरुवात केली. येथील ब्रिटिशकालीन इमारतीच्या काचा फोडण्यासह दरवाजे व साहित्याचे नुकसान करण्यात आले आहे. भरीस भर म्हणजे पालिकेने आतील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित केला आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण अंधार या परिसरात असतो. या अंधारातच व्यसनी लोकांची ये-जा होत असते. शहराच्या अन्य भागातून तरुण येथे रात्री व दिवसा येत असतात. याचा प्रचंड त्रास येथील रहिवासी, महिलांना होत आहे. मुळात हा परिसर कोयना नदीलगत असून पावसाळ्यात अनेक सर्प जलशुद्धिकरण केंद्रातून लगतच्या घरांमध्ये शिरत असल्याच्या घटना घडल्या आहेत. केंद्रात झाडी प्रचंड वाढली असून हे ठिकाण धोकादायक बनू लागले आहे.

याबाबत स्थानिक नगरसेवकांकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांनी गेली तीन वर्षे याकडे दुर्लक्ष केले आहे. व्यसनी लोकांमुळे या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी येथील गैरप्रकारांबाबत पोलिसांनाही कळविण्यात आले होते. त्यांनी अचानक धाडी टाकल्यानंतर तात्पुरते हे प्रकार थांबले होते. येथील रहिवाशांनी या केंद्राचे दरवाजे पूर्णपणे बंद करून पालिकेच्या एखाद्या कर्मचाऱ्यावर केंद्राची जबाबदारी सोपविण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाकडे केली होती. विशेषत: पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची आवश्यकता होती. मात्र अक्षम्य दुर्लक्ष करून नागरिकांच्या पैशातून उभारलेल्या या केंद्राची नासधूस होऊ देण्याचे पातक पाणीपुरवठा विभाग करीत असल्याचे दिसत आहे.

चौकट

महादेव मंदिराची होतेय देखभाल

या जलशुद्धिकरण केंद्रात जुने महादेव मंदिर असून, या मंदिराच्या परिसराची देखभाल भाविक करीत आहेत. सध्या श्रावणी सोमवार सुरू असून, या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिलांनी या केंद्राच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

फोटो

Web Title: The last factor is measuring the water purification center in Pethe on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.