बलात्कारप्रकरणी मिरजेतील एकास दहा वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: January 23, 2015 23:42 IST2015-01-23T23:31:41+5:302015-01-23T23:42:16+5:30
अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश पी. वाय. काळे यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले

बलात्कारप्रकरणी मिरजेतील एकास दहा वर्षे सक्तमजुरी
सांगली : अल्पवयीन मुलीस खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी इम्तियाज सिराज शेख (वय ४०, रा. ईदगाहनगर, मिरज) यास दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश पी. वाय. काळे यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी शेख इमारतींना रंग देण्याचे काम करतो. २४ आॅक्टोबर २०१२ रोजी त्याचे मिरजेतच काम सुरू होते. त्या इमारतीशेजारी १२ वर्षांची मुलगी व तिचा भाऊ शाळेला सुटी असल्याने खेळत होते. त्यांचे आई-वडील मजुरीसाठी गेले होते. ही संधी साधून शेखने या बहीण-भावास खाऊचे आमिष दाखवून बोलावून घेतले. मुलीच्या भावास खाऊ आणण्यासाठी पैसे देऊन त्याला पाठविले. त्यानंतर शेखने रंगकाम सुरू असलेल्या खोलीत मुलीला बोलावून घेतले. रुमालाने तिचे तोंड दाबून धरले. खिडक्या व दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. तसेच अनैसर्गिकरीत्या अतिप्रसंग केला. ही घटना उघडकीस येताच मुलीच्या नातेवाइकांनी मिरज शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शेखला तातडीने अटक केली होती. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर यांनी या खटल्याचा तपास केला होता. खटल्यात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, पंच, वैद्यकीय अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. शेखविरुद्ध भक्कम पुरावा सादर झाल्याने न्यायालयाने त्याला दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच अनैसर्गिक अतिप्रसंग केल्याप्रकरणी जादा एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. (प्रतिनिधी)