भुर्इंजमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त
By Admin | Updated: August 23, 2015 00:31 IST2015-08-23T00:31:05+5:302015-08-23T00:31:36+5:30
चौघांना अटक : पिस्तुले, तलवारी, जांबियाचा समावेश

भुर्इंजमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त
भुर्इंज : घरांमध्ये छापे टाकून भुर्इंज पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पहाटे मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये तीन पिस्तुले, दहा तलवारी, ११ गुप्त्या आणि पाच जांबिया अशा शस्त्रसाठ्याचा त्यामध्ये समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, यामध्ये आणखी संशयित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
भुर्इंजमध्ये बेकायदा शस्त्रसाठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव आणि भुर्इंज पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला बंटी ऊर्फ अनिकेत नारायण जाधव (वय १८, रा. भुर्इंज) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्या घरामध्ये एक पिस्तूल, तीन तलवारी सापडल्या. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्या अन्य तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी त्यांच्याकडे आपला मोर्चा वळविला. वरुण समरसिंह जाधव (१८, रा. भुर्इंज) याच्याकडे दोन तलवारी व एक पिस्तूल सापडले. अतुल सखाराम जाधव (रा. विराटनगर, पाचवड) याच्या घराची झडती घेतली असता दोन तलवारी व एक पिस्तूल, तसेच केतन हणमंत धुमाळ (रा. वीर, ता. पुरंदर, सध्या राहणार भुर्इंज) याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना तीन तलवारी, ११ गुप्त्या, पाच जांबिया असा मोठा शस्त्रसाठा सापडला. दरम्यान, अनिकेत व वरुण जाधवकडे सापडलेली पिस्तुले छर्ऱ्याची असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे व सहायक पोलीस निरीक्षक नारायणराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी इतर कोणाकोणाला शस्त्रे दिली आहेत, याची भुर्इंज पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे विकास जाधव, उत्तम दबडे, बंडा पानसांडे, मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे, किसन वाघ, कुडाळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टकले, लक्ष्मण डोंबाळे, गुजर, ठाकरे, हवालदार संजय थोरवे, आर. एम. भोसले, महिला पोलीस पवार, बांगर यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
संशयित लवकरच तडिपार !
भुर्इंज व परिसरात आणखी अशा प्रकारची शस्त्रे बाळगणारे युवक असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. पकडलेल्या संशयितांपैकी काहीजणांवर लवकर तडिपारची कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांनी दिली.