पोरीबाळींवरील हल्ल्यांमुळं ग्रामस्थ आक्रमक
By Admin | Updated: January 7, 2015 23:32 IST2015-01-07T22:52:24+5:302015-01-07T23:32:00+5:30
कळंबेजवळ तीन घटना : चाकू लावून जबरदस्तीचा प्रयत्न; हल्लेखोराच्या शोधासाठी ऊस पेटविण्याची तयारी

पोरीबाळींवरील हल्ल्यांमुळं ग्रामस्थ आक्रमक
सातारा : कॉलेजला चाललेली मुलगी किंवा एकटी महिला पाहून उसाच्या फडातून ‘तो’ अचानक बाहेर येतो. गळ्याला चाकू लावून ‘उसात चल’ म्हणतो. प्रतिकार केल्यास हल्ला करतो. असा प्रसंग आतापर्यंत तिघींवर गुदरला आहे. सुदैवाने तिघीही बचावल्या असून, झटापटीत एका युवतीच्या हाताला चाकू लागला आहे. ‘त्याच्या’ शोधासाठी ग्रामस्थ एकवटले असले, तरी पोरीबाळी बाहेर पडायला घाबरत आहेत. ‘त्याला’ बाहेर काढण्यासाठी ऊस पेटवून द्यायचाही पर्याय पुढे आला होता, ही मानसिकताच घटनेचे गांभीर्य अधोरेखित करते.
याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी साताऱ्यातून महाविद्यालय आणि क्लास संपवून दुपारी दीडच्या सुमारास कळंबे येथे निघालेल्या एका युवतीला अचानक समोरून येऊन एका इसमाने गळ्याला चाकू लावला. ‘तुझ्या बॅगमधले पैसे मला नको, तुझ्या अंगावरचे दागिनेही नकोत, माझ्याबरोबर उसात चल’ असे म्हणत तो तिला ओढून नेऊ लागला. यावेळी तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिचे तोंड दाबले. प्रसंगावधान राखत तिने त्याला वर्मी फटका मारत त्याच्या हातातील चाकू घेतला. या झटापटीत या युवतीच्या दोन्ही हातांना जखमाही झाल्या. तोपर्यंत मोठ्या आवाजत ही मुलगी ओरडल्याने परिसरातील एक महिला धावत आली आणि हा इसम शेतात पळून गेला. दरम्यान, या घटनामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधितांचा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.
सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारासही असाच प्रकार घडला. महाविद्यालयीन विद्यार्थिनी येत असल्याचे बघून त्याच शेतातून हा इसम बाहेर आला. गळ्याला चाकू लावून तो तिला शेतात नेत असताना पाटाच्या मातीत त्याचा पाय घसरला आणि तो कोलमडला. ही संधी साधून या मुलीनेही तिथून पळ काढला.
शनिवार आणि सोमवार दोन्ही दिवस असे प्रकार दुपारी घडल्याने गावकऱ्यांनी गस्त घालण्याचे सोमवारी रात्री ठरविले. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास एका विवाहितेलाही संबंधित इसमाने अशाच प्रकारे त्रास दिला. पण तीही त्याच्या तावडीतून निसटली.
सलग सुरू असलेल्या या प्रकारांमुळे कळंबे आणि आजूबाजूचे ग्रामस्थ, महिला चांगल्याच हादरल्या आहेत. तातडीने संबंधिताला पकडून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महिला करत आहेत. काही युवतींनी तर भीतीमुळे महाविद्यालयात जायलाही विरोध दर्शविला आहे. या दहशतीपासून मुक्ती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
गावात घडणाऱ्या घटनांविषयी आम्ही पोलिसांना कळविले आहे. दिवसाढवळ्या पोरीबाळींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत. संशयित ज्या शेतातून येतो ते मोठे उसाचे शेत आहे. त्यामुळे त्याला पकडणे अवघड जात आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सुरक्षेचे काही ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- विष्णू लोहार, पोलीस पाटील, कळंबे
तरुणांनी स्वीकारला गस्तीचा मार्ग
शनिवारी दुपारी हा प्रकार ग्रामस्थांना समजल्यानंतर परिसरात पाहणी करून संबंधिताला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो फोल ठरला. त्यामुळे तरूणांनी गस्तीचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर पुन्हा सोमवारीही अशीच घटना घडली. घटना दुपारी घडते म्हणून मुलांनी दुपारी गस्त घालण्याचे ठरविले तर मंगळवारी सकाळी एका विवाहितेवर हल्ला झाला. त्यामुळे सध्या गावात भीतीचे वातावरण आहे.