‘भूमिअभिलेख’चा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
By Admin | Updated: November 27, 2014 23:53 IST2014-11-27T23:10:30+5:302014-11-27T23:53:04+5:30
जत पोलिसांत गुन्हा दाखल : आठ हजारांची लाच घेतली

‘भूमिअभिलेख’चा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
जत : येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील लिपिक (उमेदवार) सुरेश शंकर साळुंखे (वय ४५, रा. जत, मूळ रा. गावभाग गणेशवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यास आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग, सांगली यांनी आज (गुरुवार) रंगेहात पकडले. ही कारवाई सायंकाळी पाच वाजण्याच्यादरम्यान कार्यालयातच करण्यात आली. याप्रकरणी सुरेश साळुंखे यांच्याविरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
विजय शिवाजी माने (वय ३५, रा. कैकाडी गल्ली, शिवानुभव मंडपजवळ, जत) यांच्या वडिलार्जित घरजागेची वारस नोंद करण्यासाठी भूमिअभिलेख उपअधीक्षक जत कार्यालयात त्यांनी विनंती अर्ज केला होता. अनेकवेळा विनंती करून व हेलपाटे मारुनही त्यांचे हे काम झाले नव्हते. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करून देण्यासाठी सुरेश साळुंखे यांनी विजय माने यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु हे काम कायदेशीर असून नियमित आहे, त्यामुळे मी दहा हजार रुपये देणार नाही. फक्त आठ हजार रुपये देतो, असे माने यांनी साळुंखे यांना सांगितले होते. यासंदर्भात माने यांनी लाचलुचपत सांगली कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली होती. त्यानुसार आज लाचलुचपत सांगली विभागाने सापळा लावून, सुरेश यास आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
सुरेश साळुंखे याचे मूळ गाव गावभाग गणेशवाडी, ता. शिरोळ आहे. तीन वर्षापूर्वी तत्कालीन भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सुनील लाळे यांनी त्याला येथे दैनंदिन कामासाठी बोलावून आणले होते. त्यामुळे या कार्यालयातील इतर कर्मचारी व अधिकारी यांचे खासगी काम तो करीत होता. त्यामुळे सर्वांची मर्जी त्याने संपादन केली होती. या कार्यालयात साळुंखे हा उमेदवार म्हणून काम करत असला तरी, त्याचा रुबाब मात्र अधिकाऱ्यापेक्षा जादा होता. कार्यालयातील कर्मचारी व दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांशी उध्दट वर्तन करणे, मन मानेल तसे पैसे मागून कामाची पूर्तता करणे, अन्यथा काम करण्यास नकार देणे यामुळे त्याच्याविरोधात सतत तक्रारी होत होत्या.
लाचलुचपत विभागाने या कार्यालयातील फक्त उमेदवारावरच कारवाई केली आहे. परंतु मुख्य सूत्रधार नामानिराळे आहेत. त्यांच्यावरही यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)
वारस नोंदीसाठी लाचेची मागणी
विजय माने (शिवानुभव मंडपजवळ जत) यांच्या वडिलार्जित घरजागेची वारस नोंद करण्यासाठी भूमिअभिलेख उपअधीक्षक जत कार्यालयात सुरेश साळुंखे यांनी माने यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु माने यांनी आठ हजार रुपये देतो, असे सांगून साळुंखे यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
४साळुंखे हा उमेदवार म्हणून काम करत असला तरी, त्याचा रुबाब मात्र अधिकाऱ्यापेक्षा जादा
४मुख्य सूत्रधार नामानिराळे असून, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.