जमिनी सपाटीकरणाचा फटका शेतकऱ्यांना
By Admin | Updated: November 15, 2015 01:03 IST2015-11-15T00:59:37+5:302015-11-15T01:03:28+5:30
दाद मागूनही डोळेझाक

जमिनी सपाटीकरणाचा फटका शेतकऱ्यांना
खंडाळा : खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ आता बांधकाम व्यावसायिकांनी तालुक्यात झेप घेतली आहे. औद्योगिकीकरण व बांधकाम यामुळे होणाऱ्या जमिनी सपाटीकरणाचा फटका शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. बिल्डरांनी जमिनीबरोबर ओढ्यांवर अतिक्रमण करीत सपाटीकरणाचा सपाटा लावल्याने पावसाळ्यात ओढ्यांचे पाणी शेतात जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु प्रशासनाकडे याबाबत दाद मागूनही ते डोळेझाक करीत आहेत.
खंडाळा तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रावर कारखानदारी उभी राहत आहे. त्यामुळे कंपन्यांबरोबर कामगारांचीही संख्या वाढली आहे. साहजिकच बांधकाम व्यावसायिकांची नजर खंडाळ्याकडे वळली आहे. त्यासाठी बिल्डर लोकांनी ठिकठिकाणी जागा खरेदी करून व्यावसायिक दृष्टिकोनातून सपाटीकरण चालू ठेवले आहे. तालुक्यात डोंगर टेकड्यांच्या बाजूने असणारे नैसर्गिक ओढे बंद करून ते मुजवले गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येणारे पाणी वाहून जाण्यास जागाच उरली नाही, असे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतीमालाचे लाखोंचे नुकसान होत आहे. मात्र याकडे प्रशासन लक्ष देत नाही.
खंडाळा तालुक्यात ठिकठिकाणी ओढ्यांवर नळ्या टाकून त्यावरून खासगी रस्ते बनवले गेले आहेत. काही ठिकाणी संपूर्ण ओढेच नावाखाली नैसर्गिक समतोल ढासळला जात आहे. अधिकारीही तात्पुरती समज देऊन प्रकरण मिटवतात; मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. त्यामुळे तालुक्यातील टेकड्या तर लुप्त झाल्याच आहेत. वृक्षतोडही भरपूर प्रमाणात झाली आहे. आता ओढेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मग पावसाळ्यात पाण्याचा निचरा कसा होणार हा मोठा प्रश्न आहे. हळूहळू ओढ्यांचे आकार कमी होऊ लागलेत. त्याचा परिणाम निसर्गावर होत आहे. जमिनींना लाखोंच्या किमती येत असल्याने फुटाफुटाने जागा वाढविण्याचा परिणाम ओढ्यांवर होत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी लोकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
माझ्या शेताजवळील ओढ्यावर अतिक्रमण करून जमीन सपाटीकरण केल्याने पावसाळ्यात पाणी शेतात शिरले. त्यामुळे संपूर्ण कांदा पीक पाण्यात वाहून गेले. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र, अद्याप कोणताही निर्णय कळविण्यात आला नाही.
- शामराव निकम, हरळी