अतिवृष्टीमुळे अंधारलेल्या भागात पुन्हा पेटला दिवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:01+5:302021-08-14T04:44:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : कोसळणारा पाऊस, वारा आणि रस्ते-पुलांची झालेली दुरवस्था, चिखलमय शेती अशा विदारक अवस्थेमुळे जावळीच्या ...

अतिवृष्टीमुळे अंधारलेल्या भागात पुन्हा पेटला दिवा !
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : कोसळणारा पाऊस, वारा आणि रस्ते-पुलांची झालेली दुरवस्था, चिखलमय शेती अशा विदारक अवस्थेमुळे जावळीच्या केळघर परिसरात विजेच्या तारा, खांब यांचे मोठे नुकसान झाले होते. यातून मार्गक्रमण करत महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी पावसात चिखल तुडवत या भागातील गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. यामुळे अतिवृष्टीमुळे अंधारलेला बहुतांश भाग आता पुन्हा प्रकाशमान झाला आहे. याकरिता महावितरणच्या कर्मचारी आणि अधिकारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
जावळीचा भूभाग हा डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मात्र महावितरणला याचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणचे वीजखांब वाहून गेले तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाले. अशा अडचणीच्या परिस्थितीत या भागातील वीज पुरवठा सुरळीत करणे मोठे दिव्यच होते. तरीही या नदी, ओढे, चिखलमय भागातून ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करत हा भाग पुन्हा प्रकाशमान करायचा होता. याकरिता गावातील वीज पुरवठा सुरळीत करून या अंधारलेल्या गावात उजेडासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन बनकर आणि त्यांच्या सर्वच कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होती. भर पावसातही त्यांनी आपले काम सुरू ठेवले. प्रचंड मेहनत घेत आपत्तीच्या काळात कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्यभावना जोपासत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम पूर्ण केले आहे. यामुळे आपत्तीग्रस्त बहुतांश भागात आता पुन्हा विजेचा दिवा पेटला आहे.
स्वतःच्या जीवावर उदार होत अतिवृष्टीच्या काळात आपत्तीग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना येथील ग्रामस्थांची मोठी मदत झाली. पश्चिम भागात तापोळा कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तर पुराच्या पाण्यातून मार्ग काढत सौंदरी, सोनाट व कुरोशी या भागातील २३० घरांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. घरगुती आणि पाणी पुरवठा यांचा वीज पुरवठा प्राधान्याने सुरु करण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. आता उर्वरित व्यावसायिक, शेतीपंप व इतर घटकांचाही वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
(कोट)
अतिवृष्टीमुळे वादळ, वाऱ्याच्या परिस्थितीमुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामध्ये विद्युत वाहिनीचे मोठे नुकसान झाले. आपत्तीग्रस्त भागातील गावांचा वीज पुरवठा पूर्ववत करणे जिकरीचे काम होते. याकामी ग्रामस्थांचीही मोठी साथ मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष फिल्डवर सर्वच कर्मचाऱ्यांची तत्पररता, चिकाटी, सहकार्यामुळे वेळेत विद्युत पुरवठा पूर्ण होण्यास मदत झाली. याकामी नियोजनानुसार कार्यवाही झाल्याने गावांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला. आता शेतीपंप व इतर पुरवठा वेळेत सुरू करण्यासाठी कामकाज सुरू आहे.
- सचिन बनकर, उपकार्यकारी अभियंता, मेढा
१३ कुडाळ
फोटो: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.