चोरीच्या ट्रकमधून कपडे लंपास
By Admin | Updated: January 26, 2015 00:45 IST2015-01-26T00:42:59+5:302015-01-26T00:45:42+5:30
शामगावला ट्रक बेवारस आढळला : पुसेसावळीमधून झाली होती चोरी

चोरीच्या ट्रकमधून कपडे लंपास
शामगाव : चोरून आणलेल्या मालवाहतूक ट्रकमधील साडेनऊ लाखांचे कपडे लंपास करून चोरट्यांनी ट्रक शामगाव, ता. कऱ्हाड परिसरात बेवारस स्थितीत सोडून दिला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, संबंधित ट्रक पुसेसावळी येथून शनिवारी रात्री चोरीस गेला होता.
औंध पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शामगाव येथील बबन पोळ व बापूराव पोळ हे रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये जात असताना शिंदेवस्ती शिवारात मालवाहतूक ट्रक (एमएच ११ एम ४१५४) बेवारस स्थितीत उभा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ट्रकनजीक जाऊन पाहिले असता, ट्रकमधील माल उतरविण्यात आल्याचे व त्यामुळे परिसरात कचरा विखुरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच ट्रकनजीक कोणीही नव्हते. त्यामुळे त्या दोघांनी ट्रकवर लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.
संबंधित मोबाईल क्रमांक येळीव, ता. खटाव येथील धनाजी जगताप यांचा होता. पोळ यांनी शामगावमध्ये ट्रक बेवारस स्थितीत उभा असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित ट्रक माझाच असून, तो आज पहाटे घरासमोरून चोरीस गेल्याचे धनाजी जगताप यांनी त्यांना सांगितले. माहिती मिळाल्यानंतर धनाजी जगताप यांच्यासह औंध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय देसाई, अशोक वाघमारे, कृष्णा सरडे यांच्यासह पथक शामगावमध्ये पोहोचले.
पथकाने ट्रकची पाहणी केली असता, ट्रकमधील साडेनऊ लाखांची कपडे चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)