ओढा बंदिस्त करणाऱ्यांचे पितळ उघडे!
By Admin | Updated: July 21, 2015 00:39 IST2015-07-21T00:39:11+5:302015-07-21T00:39:11+5:30
गुन्हा दाखल होणार : पालिका प्रशासनाची कारवाई

ओढा बंदिस्त करणाऱ्यांचे पितळ उघडे!
सातारा : सदर बझार येथे ओढा पाईपलाइनद्वारे बंदिस्त करण्याचे सुरू असलेले काम पालिका प्रशासनाने थांबविले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाला दिले.
सोमवारी तहसीलदार राजेश चव्हाण यांना सदर बझार येथील ब्रिटिशकालीन ओढा बंदिस्त करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्वरित पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदार व मुख्याधिकारी घटनास्थळी गेले. याठिकाणी एका अपार्टमेंटच्या ड्रेनेज पाईपलाइनचे काम सुरू होते. या पाईपस ब्रिटिशकालीन ओढ्यात सोडण्यात आल्याच्या निदर्शनास आले.
या पाईपचे तोंड ज्याठिकाणी सोडण्यात आले आहे, तिथे पुलाची पुरातन भिंत दिसत असल्याने याठिकाणी ब्रिटिशकालीन ओढा असल्याचे सिद्ध झाले आहे. हा ओढा मुजवून त्यावर बांधकाम करण्याचा संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा हेतू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी बांधकाम अभियंता प्रदीप साबळे यांना माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.
शहरातील ओढे कागदोपत्री नसल्याचा गैरफायदा काही बांधकाम व्यावसायिकांनी घेतला असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पालिका प्रशासनानेही संबंधितांवर कठोर कारवाई केल्यास ओढे बंदिस्त करण्याचे धाडस होणार नाही. ओढे बंदिस्त केले जात असल्याने पावसाळ्यात ओढे तुंबण्याचे प्रकार वारंवार घडतात. पाणी उलटून ते लोकवस्तीत घुसते. तरीही प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अशी बांधकाम होताना दिसत आहेत.
गोडोली येथे दोन ओढे बंदिस्त केले गेले होते, त्यानंतर हा नव्याने प्रकार सुरू होता. सदर बझार येथील ओढा बंदिस्त केल्याप्रकरणी सोमवारी उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. पालिका प्रशासन संबंधितांवर कठोर कारवाई करणार की, त्यांना क्लिन चिट देऊन बेकायदा बांधकामांना खतपाणी घालणार, याबाबत नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)