लक्ष्मी आली शिक्षणाच्या पायी..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:39+5:302021-09-13T04:38:39+5:30
सातारा : ‘लक्ष्मी आल्या का?’, ‘आल्या...’ कशाच्या पायी? ‘शिक्षणाच्या पायी..’, ‘धनदौलतीच्या पायी...’, ‘आरोग्याच्या पायी...’ असे म्हणत घरोघरी रविवारी गौराईचे ...

लक्ष्मी आली शिक्षणाच्या पायी..!
सातारा : ‘लक्ष्मी आल्या का?’, ‘आल्या...’ कशाच्या पायी? ‘शिक्षणाच्या पायी..’, ‘धनदौलतीच्या पायी...’, ‘आरोग्याच्या पायी...’ असे म्हणत घरोघरी रविवारी गौराईचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान, गौरीचे आगमन होणार असल्याने बाजारपेठ सकाळपासूनच फुलली होती. सजावटीच्या साहित्यासह मिठाईला मोठी मागणी होती.
साताऱ्यात कोरोनाचे सावट असले तरी, यंदा गौरी-गणपती उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवास शुक्रवार, दि. १० रोजी उत्साहात प्रारंभ झाला. साध्या पद्धतीने गणरायाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी गौराईचे आगमन झाले. गौरीच्या आगमनाची दोन दिवसांपासून घरोघरी तयारी सुरू होती. गृहिणी गौरीसमोर ठेवण्यासाठी मिठाई बनवत होत्या. त्याचप्रमाणे यंदा सजावट कशी करायची, याची तयारी सुरू होती. गौरीच्या स्वागताला सकाळपासूनच साताऱ्यात पाऊस पडत होता. त्यामुळे चांगलीच धांदल उडाली.
घर, नोकरी सांभाळणाऱ्या गृहिणींना तयारीसाठी फारसा वेळ न मिळाल्याने, आवश्यक त्या वस्तू खरेदीसाठी सातारकरांनी भर पावसात बाजारपेठेत गर्दी केली होती. यामध्ये दुर्वा, आघाडा, शोभेच्या वस्तू, सजावटीसाठीच्या वस्तू, मिठाई खरेदीसाठी गर्दी केली होती. काहींनी सकाळीच पूर्ण तयारी करून गौरीचे आणल्या, तर ग्रामीण भागात रात्री तिन्हीसांजेला गौरी घरोघरी आणल्या. यावेळी तुळशी वृंदावनापासून घरात पावले काढून त्यावर कुंकवाचे छाप मारण्यात आले. सुवासिनींनी एकमेकींच्या घरी जाऊन ‘लक्ष्मी आल्या का...?’ ‘आल्या !’, ‘कशाच्या पायी शिक्षणाच्या पायी...’, ‘लक्ष्मी आल्या का?’ ‘आल्या...’ कशाच्या पायी?, ‘आरोग्याच्या पायी...’ म्हणत स्वागत केले. त्यानंतर हळदी-कुंकू, चहापाणी करण्यात आले.
चौकट :
भाजीची आवक वाढली
गौरी तीन दिवसांसाठी येत असते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. त्यामुळे साताऱ्यातील राजवाडा परिसरात शेपू, मेथीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली होती. मेथीची भाजी पंधरा रुपये, तर शेपू भाजी दहा रुपयांना पेंडी मिळत होती.
फोटो
१२सातारा-गौरी
साताऱ्यात घरोघरी रविवारी गौराईचे उत्साहात स्वागत करण्यात आले. (छाया : जावेद खान)