मांढरदेवला लाखो भाविक दाखल

By Admin | Updated: January 5, 2015 00:39 IST2015-01-04T22:47:46+5:302015-01-05T00:39:34+5:30

काळुबाई यात्रा : आज मुख्य दिवस; सकाळी पूजा व आरती

Lakhs of devotees filed their dues | मांढरदेवला लाखो भाविक दाखल

मांढरदेवला लाखो भाविक दाखल

मांढरदेव : महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळुबाईच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. लाखो भाविक वेगवेगळ्या वाहनांने मांढरदेव येथे दाखल होत आहेत. पालीच्या यात्रेत झालेल्या चेंगराचंगरीच्या घटनेनंतर मांढरदेव येथे अशा प्रकारची घटना होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे.
यात्रेचा सोमवार, दि. ५ हा मुख्य दिवस असला तरी रविवारपासून यात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभीच्या दिवशी रविवार आल्याने भाविकांनी गर्दी केली होती. देव्हारे डोक्यावर घेऊन लाखो भाविक मांढरदेव येथे दाखल झाले आहेत. रविवारी रात्री जागर होणार असून, सोमवारी सकाळी सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे चेअरमन ए. पी. रघुवंशी व वाईचे प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते देवीची आरती व पूजा होणार आहे.
यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मोठा फौज फाटा मांढरदेव येथे दाखल झाला आहे. यात्रेसाठी एक पोलीस उपाधीक्षक, एक पोलीस निरीक्षक, १२ उपनिरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, २५ महिला पोलीस कर्मचारी, ६० होमगार्ड, वाहतूक शाखेचे २० कर्मचारी व आरसीपीचे प्रत्येकी एक पथक मांढरदेव येथे तैनात आहे. अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंटचे १२० स्वयंसेवक व कोल्हापूरहून आलेल्या व्हाईट आर्मीचे ६० स्वयंसेवक भाविकांच्या सोयीसाठी सज्ज आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय विभागाची पथके काळुबाई मंदिर, ग्रामपंचायत व उतरणीच्या मार्गावर कार्यरत आहेत. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती व जिल्हा परिषदचे कर्मचारी, महसूल विभाग, वीजवितरण कंपनीचे कर्मचारी मांढरदेव येथे तळ ठोकून आहेत. अग्निशामक दलाचे पाण्याचे टँकर, क्रेन, रुग्णवाहिका मांढरदेव येथे पोहोचले आहेत.
यावर्षी रविवार, सोमवार व मंगळवार या दिवशी यात्रा आली आहे. रविवार सुटीचा वार, सोमवार मुख्य यात्रा व मंगळवार देवीचा वार असल्याने या तिन्ही दिवशी भाविक मांढरदेव येथे गर्दी करण्याची शक्यता आहे.
काळुबाई यात्रेत मांढरदेव येथे पशुहत्या करणे, वाद्य वाजविणे, झाडाला लिंबे ठोकणे, काळ्या बाहुला ठोकणे, करणी करणे, दारूविक्री करणे, यावर बंदी घालण्यात आली आहे. यात्रेत पशुहत्या होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन दक्ष आहे. (वार्ताहर)


गोंजीरबाबा व मांगीरबाबा मंदिरे दर्शनासाठी खुली...
देवीचे सेवक मानले जाणाऱ्या गोंजीरबाबा व मांगीरबाबा या देवतांची मंदिरे यात्रा कालावधीत खुली आहेत. काही वर्षांपूर्वी यात्रेचे नियोजन करताना बॅरेगेट रचना करताना मंदिरे बंद ठेवण्यात आलेली होती. त्यावेळी आंदोलन केले होते. यावर्षी बॅरेगेट््स रचनेत बदल केल्यामुळे भाविक काळुबाईचे दर्शन घेतल्यानंतर गोंजीरबाबा व मांगीरबाबा या देवतांचे दर्शन घेत आहेत.

Web Title: Lakhs of devotees filed their dues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.