जिभेवर ‘लाखोली’... डोळ्यांत पाणी!---आॅन दि स्पॉट रिपोर्ट
By Admin | Updated: January 9, 2015 00:00 IST2015-01-08T23:00:30+5:302015-01-09T00:00:42+5:30
कळंबेत बायाबापड्या भेदरल्या : पोरीबाळींना ‘उसात चल’ म्हणून धमकावणाऱ्या हल्लेखोराची मनामनात दहशत-

जिभेवर ‘लाखोली’... डोळ्यांत पाणी!---आॅन दि स्पॉट रिपोर्ट
प्रगती जाधव-पाटील -सातारा -दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं... नजर जाईल तितक्या लांबच लांब शेतांच्या रांगा... त्यातून असणारी सवयीची मळवाट... दुपारच्या उन्हात पाळीव जनावरं सोडली तर कुत्रंही फिरकत नाही, अशी जागा... तिथंच त्या तीन घटना घडलेल्या. आता गावातल्या पोरीबाळी बाहेर जाणार असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी गावातल्या आणि घरातल्या पुरूषांची ‘ड्युटी’ लागली आहे. रापलेल्या, वैतागलेल्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह .... हे कधी थांबणार?
सातारा तालुक्यातलं कळंबे हे साधारण दोन हजार लोकवस्ती असलेलं गाव. गावाच्या बाजूनं नदी आणि कॅनॉल यांची माळ असल्यामुळं या भागातली शेती बारा महिने हिरवीगार असते. गावातलं घरटी एक माणूस नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं साताऱ्यात येतो. दिवसा गावात वयोवृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांचाच वावर अधिक.
वर्षानुवर्षं मुलींकडे वाकड्या नजरेनं बघण्याचं कुणाचं धाडस नव्हतं. अशा या गावात आता पोरीबाळांची अब्रू चाकुच्या धाकानं लुटू पाहणारा कोणीतरी माथेफिरू शेतात भटकतोय. ‘केवळ नशीब बलवत्तर म्हणून आमच्या पोरी वाचल्या,’ असं गावातल्या आया-बाया सांगतायत. ‘आता आम्ही तिला पाहुण्यांकडे सातारलाच ठेवलंय,’ हेही वाक्य घराघरातून ऐकू येतंय. कारण, समाजाच्या दबावापेक्षाही त्यांना चिंता आहे त्या आपल्या कोवळ्या मुलींच्या आयुष्याची आणि इभ्रतीची!
गावात कुणी अनोळखी पुरूष, मुलगा आला तरी गावकऱ्यांची नजर आता त्याच्याकडं संशयानं बघते. पूर्ण खात्री झाल्याशिवाय परक्या पुरुषाला शिवारात फिरायलासुद्धा जणूकाही अलिखित बंदीच! गावात ठिकठिकाणी महिला आणि युवक एकत्र येऊन आज कुठे काही अघटित घडलं नाही ना, याची चाचपणी करताना दिसतायत. परस्परांना फोन नंबर देऊन त्यांनी ‘सुरक्षा व्यवस्था’ यंत्रणा उभारण्याचा आपल्या परीनं प्रयत्न केलाय.
नुनेमार्गे कळंबे गावात जाताना एक छोटी पायवाट आहे. कॉलेजमधून येणाऱ्या अनेक मुली हल्ली प्रसंगी अर्धा-अर्धा तास नुने थांब्यावर थांबून राहतात. पण या वाटेनं एकट्या येण्यास धजावत नाहीत. गावातला कुणी ओळखीचा पुरूष भेटला तरच त्याच्या आधारानं या मुली घरी जातात. काहीजणी तर सातारा स्टॅण्डवरच थांबणं पसंत करतात. तिथून ओळखीच्या व्यक्तीबरोबर त्या गावापर्यंत पोहोचतात.
गावातील कोणत्याही महिलेशी या प्रकाराविषयी बोललं की लगेच ‘त्याला’ उद्देशून शिव्यांची लाखोली वाहिली जाते. ‘समोर ये म्हणावं; जोड्यानंच मारते,’ अशा अस्सल शब्दांत भावना व्यक्त होते. तोंडात शिव्या, डोळ्यात पाणी आणि मनात हुरहूर असं चित्र इथं पाहायला मिळतंय.
ऐकावं ते नवलच...!
माझी उभी हयात हितं गेली पन गावच्या बाईकडं कधीबी कुणी वर नजर करून बघण्याची हिंमत नाय केली. चार दिवसांपासन गावाचं चितारच बदललंय. समद्यांच्या तोंडावर कसलीतरी भीती डोकावतीय! एका पोरीला सोडायला चार-चार जण जातायत... जग लय बदललंय. आता आपल्या शेतात जायलाबी भ्या वाटायला लागलंय.... कळंबे येथील हिराबाई दळवी यांची सद्य:स्थितीवरील ही टिप्पणी गावातील दहशत सोप्या शब्दांत सांगून जाते.
हेच ते दहशतीचं वळण...! काळ्या आईने हिरवा शालू नेसला की तिचं हे रूप शेतकऱ्याला मोहात पाडतं. आपल्या कष्टाचं फळ शेता-शिवारात डोलताना बघून त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद ओसंडतो. कळंबेतील बळीराजाच्या जिवाला मात्र या पिकांमुळेच घोर लागलाय. उभ्या पिकांचा आडोसा करून पोरीबाळींवर हात टाकणारा ‘तो’ याच शेतात लपून बसतो आणि एकटी बाई आली की याच वळणावर तिला गाठून ‘उसात चल’ असं गळ्याला सुरा लावून सांगतो.
.
जिवावर बेतलं; बोटावर निभावलं
कळंबे गावातली एक विद्यार्थिनी रविवारी दुपारी क्लास संपवून घरी येत होती. झाडाखाली कुणीतरी झोपल्याचं तिनं पाहिलं. हे नित्याचंच असल्यामुळं तिने त्याकडे फार बारकाईनं लक्ष दिलं नाही. काही पावलं चाललल्यावर तिला आपला पाठलाग होत असल्याचं लक्षात आलंं. त्यानंतर आसपास कुणी आहे का, हे पाहण्यासाठी ती हळूहळू चालू लागली. तोपर्यंत ‘तो’ झटकन तिच्यापुढे उभा राहिला आणि ‘ओरडू नकोस नाहीतर गळा चिरीन,’ अशी धमकी देत तिच्या तोंडावर हात ठेवून तिला शेतात ओढू लागला. ‘त्याच्या’ हातात धारदार सुरा असल्यामुळं युवती घाबरली. तरीही धाडस करून तिनं तिच्या तोंडावरील त्याचा हात काढला आणि गळ्यापासून चाकू लांब नेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिच्या दोन बोटांना जबर दुखापत झाली आणि रक्त वाहू लागलं. अनपेक्षित घडलेल्या या घटनेनंतर तो उसाच्या शेतातून पसार झाला. जिवावरचं संकट बोटावर निभावल्याने ही विद्यार्थिनी धूम पळत सुटली. नदीकाठी येईपर्यंत तिला भोवळ आली. गावातल्या काही महिलांनी तिला जागं केलं. त्यानंतर या घटनेची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
आता तरी गावात एसटी येऊ द्या!
कळंबे गावातील प्रत्येक घरातली एक व्यक्ती रोज साताऱ्याला ये-जा करतो. पण गावात एसटी बस वेळेत येत नसल्यामुळं नदी ओलांडून नुनेमार्गे प्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यानच मुलींवर हल्ले झाल्यामुळं आता गावकरी एकवटून त्यांनी एसटी सुरू करण्यासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेतलाय. शुक्रवार, दि. ९ जानेवारीला सकाळी गावातील काही मंडळी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून एसटी सुरू करण्याचे निवेदन देणार आहेत.
आमच्या गावात कधीच असा प्रकार घडला नव्हता. पण गेल्या काही दिवसांपासून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. उसाच्या शेतातून ‘तो’ कधी येईल आणि हल्ला करेल याची शाश्वतीच राहिली नाही. त्यामुळं आम्ही तरूणींना एकटं जाऊ नका, असं सांगितलंय. गावात एसटीच्या फेऱ्या वाढल्या तर मुली सुरक्षित प्रवास करतील.
- प्रकाश चिंचकर, सरपंच, कळंबे