तलाव आटला; विहिरींमध्येही ठणठणाट !
By Admin | Updated: August 11, 2015 23:26 IST2015-08-11T23:26:24+5:302015-08-11T23:26:24+5:30
ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईच्या झळा : पाचूंद, मेरवेवाडी, कामथी, वाघेरीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

तलाव आटला; विहिरींमध्येही ठणठणाट !
बाळकृष्ण शिंदे- शामगाव ऐन पावसाळ्यात दुष्काळी शामगाव विभागातील विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच या विभागाची तहान भागविणाऱ्या मेरवेवाडी तलावातही ठणठणाट आहे. त्यामुळे काही दिवसातच परिसरातील गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवणार असल्याचे चित्र आहे. परिणामी, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कऱ्हाड तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या घाटमाथ्यावरील व घाटालगतच्या गावांमध्ये पाऊस नसल्याने दुष्काळाचे सावट पडू लागले आहे. छोटे मोठे बंधारे आटले आहेत. तर मोठ्या तलावातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. आॅगस्ट महिना उजाडला तरी पाऊस पडत नसल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. पावसाळ्याचा कालावधी संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने पहिला हंगाम पूर्ण वाया जाणार आहे. त्याचबरोबर या दुष्काळी गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवणार आहे. मेरवेवाडी तलावातून मेरवेवाडी, पाचुंद, वाघेरी, कामथी या गावांना पाणी पुरवठा केला जातो. या तलावातून शेतीला पाणी दिले जात नाही; परंतु तलावाखाली असणाऱ्या विहिरींना याचा फायदा होतो. त्यामुळे येथील वीस ते तीस एकरांचा पट्टा हिरवागार दिसतो; परंतु यंदा दरवर्षीपेक्षा पाणी पातळी जास्त घटल्याने या चार गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवणार
आहे. पाचुंद सारख्या गावात पाण्याचा कसलाही स्त्रोत नसल्याने स्थलांतर करावे, हाच पर्याय ग्रामस्थांसमोर राहिला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याच्या भीतीने ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.
पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे विहीरी, तलाव आटले असून कुपनलिकाही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गावात पाणी पुरवठा योजना असुनही त्याचा उपयोग होत नाही. सध्या दोन दिवसातून एकदा नळाद्वारे पाणी पुरवठा होतो. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवारात कोठेही पाणी नाही.
- महेश जाधव, सरपंच, पाचूंद
१ वळीव पावसानेही पाठ फिरविली
कऱ्हाड तालुक्यात यावर्षी ठिकठिकाणी जोरदार वळीव पावसाने हजेरी लावली होती. मात्र, त्यावेळीही शामगाव विभागात म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. वळीव पाऊस चांगला झाला असता तर त्याचा विहीर, तलावातील पाणीसाठ्याला फायदाच झाला असता. मात्र, पाऊसच न झाल्याने विहीर व तलावात पाणीसाठा झालेला नाही. सध्या मान्सून पाऊसही या विभागात पडत नाही. त्यामुळे काही दिवसांतच या विभागाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. ही परिस्थिती ओळखून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.
पाचंूद : गावाची लोकसंख्या सुमारे ६०० असून गावात ९ विहीरी आहेत. मात्र, सध्या एकाही विहीरीत पाणी नाही. त्यामुळे गावाचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे.
२ मेरवेवाडी : गावामध्ये पाणी साठवण तलाव आहे. मात्र, या तलावातील पाण्याची पातळी पूर्णत: घटली आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ७०० आहे. गावात सुमारे ३५ विहीरी असून या विहीरीत सध्या जनावरांना पिण्यापुरतेच पाणी उपलब्ध आहे. गावात असणाऱ्या तीनपैकी एकाच कुपनलिकेला पाणी आहे.
३ कामथी : कामथी हे विभागातील मोठे गाव असून या गावाची लोकसंख्या १ हजार ५० आहे. या गावात सुमारे ५० विहीरी आहेत. मात्र, सध्या या विहीरीत जेमतेम पाणी उपलब्ध आहे. गावात असणाऱ्या ६ पैकी ३ कूपनलिका चालूस्थितीत आहेत.
४ वाघेरी : गावाची लोकसंख्या ४ हजारच्या आसपास आहे. येथे दोनशेहून अधिक विहीरी आहेत. मात्र, या विहीरींची पाणीपातळी सध्या चांगलीच घटली आहे. गावातील ६ पैकी फक्त दोन कुपनलिका सुरू आहेत.