तीन हजार महिलांमागे एक ‘लेडी कॉन्स्टेबल’
By Admin | Updated: January 20, 2015 00:04 IST2015-01-19T21:47:54+5:302015-01-20T00:04:14+5:30
जिल्ह्यात बळ अपुरे : सावित्रीच्या लेकींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

तीन हजार महिलांमागे एक ‘लेडी कॉन्स्टेबल’
मोहन मस्कर-पाटील- सातारा -जिल्ह्यात साडेचौदा लाखांच्या आसपास असणारी महिलांची लोकसंख्या आणि महिलांवरील अत्याचाराची वाढती टक्केवारी लक्षात घेता सद्य:स्थितीत असणारे महिला पोलीस बळ अतिशय अपुरे आहे. लोकसंख्येची तुलना करता जिल्ह्यात ३,०६५ महिलांमागे एक ‘लेडी कॉन्स्टेबल’ आहे. अशी परिस्थितीत मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन शिक्षा’ अभियान कसे यशस्वी होणार आणि जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकी कशा सुरक्षित राहणार, असाही प्रश्न आता पुढे आला आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्याची लोकसंख्या तीस लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र, लोकसंख्या आणि एकूण पोलीस बळाचा विचार करता जिल्ह्यात आजमितीस १,०५० जणांमागे एक पोलीस कर्मचारी आहे. जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांतून एकूण पोलीस संख्या २,८६८ इतकी आहे. मात्र, महिला पोलीस आणि महिला लोकसंख्येचा विचार करता यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. जिल्ह्यातील महिला पोलिसांची संख्या ४७३ इतकी तर महिलांची लोकसंख्या १४.५० लाखांहून अधिक आहे. याचाच अर्थ ३,०६५ महिलांमागे एक ‘लेडी कॉन्स्टेबल’ आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर हे तीन जिल्हे आणि पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या दोन विभागांचा विचार करता सातारा जिल्हा महिला अत्याचारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे खास करून महिलांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचारी संख्या वाढणे अपेक्षित आहे. आजमितीस सातारा जिल्ह्यात असणारे २,८६८ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी दररोज रजेवर जाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे त्यांची कमतरताही त्याचप्रमाणात नेहमीच प्रत्येक पोलीस ठाण्यात जाणवते.
कोयनानगर, तळबीडला महिला पोलीस कमी
सातारा, फलटण, कऱ्हाड, दहिवडी, शाहूपुरी येथे सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक म्हणून महिला कार्यरत असल्या तरी त्यांचेही प्रमाण खूप कमी आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात नियमाप्रमाणे सहा महिला पोलीस कर्मचारी असावेत, असा नियम आहे. सातारा पोलीस मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाणी आणि औट पोस्टमध्ये नियमानुसार पोलीस संख्या आहे. मात्र, तळबीड आणि कोयनानगर या दोन ठाण्यांत महिला पोलिसांची संख्या कमी आहे.
दृष्टिक्षेपात सातारा जिल्हा एकूण लोकसंख्या : 30 लाख
पुरुष : 15.50 लाख
महिला : 14.50 लाख
एकूण पोलीस ठाणी : 28
एकूण कर्मचारी : 2,868
पुरुष : 2,395
महिला : 473
महिला सुरक्षा समिती स्थापन होणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिशन शिक्षा’ अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीत आता अमूलाग्र बदल होणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येक शिफ्टमध्ये दोन याप्रमाणे सहा महिला पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना महिला सुरक्षा समिती स्थापन करावी लागणार आहे. फक्त एवढ्यावरच न थांबता या समितीची बैठक प्रत्येक महिन्याला घ्यावी लागणार आहे.
अत्याचार वाढतच आहेत
‘राज्य गुन्हे अन्वेषण विभाग’ तथा ‘सीआयडी’च्या अहवालातील माहितीनुसार २०१३ मध्ये सातारा जिल्ह्यात स्त्रियांवरील अत्याचाराच्या ७२४ घटना घडल्या. यावर्षीचा आकडा अजून जाहीर झाला नसला तरी बहुधा यामध्ये वाढ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होतच आहे. कौटुंबिक हिंसाचार तर मर्यादेच्या पलीकडे गेला आहे.
पाच दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकालगत एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या तीन नराधमांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. अशा कितीतरी घटना घडत आहेत. जिल्ह्यात अत्याचारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्यावर्षीची अत्याचाराची आकडेवारी ८८ इतकी आहे.एकूण आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाकडे असणारे मनुष्यबळ अतिशय अपुरे आहे.