लेडीज बसची देशाला भुरळ
By Admin | Updated: September 23, 2016 00:37 IST2016-09-22T23:24:43+5:302016-09-23T00:37:48+5:30
कन्या सुरक्षा अभियान : अनेक शहरांमध्ये मलकापूरची योजना राबविणार...

लेडीज बसची देशाला भुरळ
मलकापूर : तीन वर्षांपूवी मलकापूर नगरपंचायतीने राबविलेली ‘लेडीज स्पेशल बस’ची योजना आता देशभरातील अनेक शहरांमध्ये राबविली जाणार असून, यामुळे सातारा जिल्ह्याचे नाव उंचावले गेले आहे. मुलींचे शैक्षणिक करिअर उंचावणाऱ्या या योजनेचे कौतुकही होत आहे.
‘केवळ पाणी, रस्ते अन् ड्रेनेज एवढीच आपली जबाबदारी नाही. आपल्या गावातील पोरीबाळींच्या सुरक्षेचीही जबाबदारी आपण उचलायला हवी,’ अशी स्पष्ट भूमिका मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी घेतली होती.
त्यानंतर २०१३ मध्ये मलकापुरात राहणाऱ्या; परंतु कऱ्हाडात शिकण्यासाठी जाणाऱ्या कॉलेजकन्यांंना मोफत पास देण्याचा ठराव नगरपंचायतीनं मांडला. या पासचा निम्मा खर्च पंचायतीनं तर निम्मा एसटी महामंडळानं उचलला. अन् ७ जुलै रोजी श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानांतर्गत ‘ओन्ली गर्ल्स् बस’ प्रवासाला निघाली.
एका स्थानिक स्वराज संस्थेनं सुरू केलेली देशातली पहिली ऐतिहासिक बस. ना तिकिटाच्या पैशाची चिंता ना पुरुषांच्या घोळक्यात चेंगरण्याचं झंझट. रोज सकाळी एक बस ठराविक स्टॉपवर येऊन उभारते. त्यात प्रवेश फक्त अन् फक्त मुलींनाच. आतमध्ये कंडक्टरही महिलाच. बस भरली की निघाली थेट कॉलेजला. कुठेही गोंधळ नाही की ढकलाढकली नाही. पुरुषी नजरा नाहीत की त्यांचा स्पर्शही नाही. त्यामुळे मुलींची मानसिक स्थिती अत्यंत कणखर बनल्याचे निष्पन्न झाले आहे.
आंध्र प्रदेशातील राजमुंडरी महानगरपालिकेनंही सेम अश्शीच बससेवा सुरू केलीय. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयावर विसंबून न राहता राज्य शासनानंच पुढाकार घेऊन सर्वत्र अशी योजना अंमलात आणणं अत्यंत गरजेचं बनलंय. (प्रतिनिधी)