पाटणमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
By Admin | Updated: July 21, 2015 00:35 IST2015-07-21T00:35:30+5:302015-07-21T00:35:30+5:30
जुना, नवीन एसटी स्टॅण्ड परिसरातील चित्र; वाहनधारक हैराण

पाटणमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
पाटण : दिवसभरात कधीही या आणि कराड-चिपळूण रस्त्यावरील जुना स्टॅण्ड परिसरातून न थांबता आपली वाहने घेऊन जाऊन दाखवा, अशी बक्षीस योजना जाहीर करण्याची वेळ आलेल्या पाटण शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. पुन्हा बोकाळलेली अतिक्रमणे, पोलिसांचा वचक न राहिल्याने वाहनधारकांचे बेशिस्त पार्किंग आणि वडाप वाहतुकीसाठी राजरोसपणे उभी राहिलेली वाहने याचा त्रास लांब पल्ल्याच्या वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रस्ता म्हणजे गुहागर ते पंढरपूर-जत हा राज्यमार्ग होय. पाटणमधून जाणारा हा रस्ता सध्या डोकेदुखी बनलाय. कारण पाटण शहरातील नवीन बसस्थानक व जुना बसस्थानक हे आहे. पाटणच्या वाहतूक पोलिसांचे कसलेही नियंत्रण न राहिल्यामुळे याठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. कसली वाहन तपासणी नाही, वाहतूक पोलिसांचे दर्शन नाही.
यामुळे रस्ता आपल्या मालकीचा आहे. अशा आविर्भावात वागणारे स्थानिक वाहनधारक रस्त्याच्या कोणत्याही दिशेला आपली वाहने उभी करतात. तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्मा कदम यांनी या रस्त्यावरील काढलेली अतिक्रमणे आता हातपाय पसरू लागली आहेत. तर सम-विषम पार्किंगचे नियम बासनात गुंडाळून ठेवल्याचे चित्र दिसू लागले आहे. वाहनधारकांच्या बेताल वागण्यामुळे जुना एसटी स्टॅण्ड परिसरात सतत ट्रॅफिक जाम होते. सोमवारी बाजारादिवशी दर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. भाजीमंडईत खरेदी करण्यासाठी आलेल्या तालुक्यातील नागरिकांना देखील त्रास होत असतो. (प्रतिनिधी)