शिव्या कमी.. कलकलाट फार !
By Admin | Updated: August 8, 2016 23:35 IST2016-08-08T23:21:14+5:302016-08-08T23:35:56+5:30
बोरीचा बार : रिमझिम पावसात बोरी अन् सुखेडच्या महिलांनी जपली परंपरा

शिव्या कमी.. कलकलाट फार !
लोणंद : खंडाळा तालुक्यातील बोरी अन् सुखेड या गावच्या दरम्यान असलेल्या ओढ्यात दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ‘बोरीचा बार’ रंगतो. दोन्ही गावांतील महिला समोरासमोर येऊन एकमेकींना खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देण्याची परंपरा आहे. मात्र, बदलत्या काळानुसार शिव्यांची पद्धत काहीशी मागे पडत केवळ कलकलाट ऐकायला मिळतो. यंदाही सोमवारी दुपारी ‘बोरीचा बार’मध्ये रिमझिम पावसात शिव्या कमी पण कलकलाट अधिक ऐकायला मिळाला.
या गावातील ओढ्याच्या काठी दोन्ही गावांतील महिला दुपारी सवाबारा वाजता मिरवणुकीद्वारे समोरासमोर आल्या. रिमझिम पावसात या ठिकाणी आल्यानंतर हलगीच्या तालावर, तुतारीच्या निनादात बोरीचा बार रंगला. मात्र, यंदा ओढ्यात पाणी असल्याने महिलांच्या उत्साहावर पाणी फिरले. यावेळी कलकलाटच अधिक झाला.
या ओढ्यात दोन्हीकडच्या महिला प्रतिस्पर्धी गावातील महिलेला ओढत आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या महिलेला ओढत आपल्या हद्दीत आणले जाते, तिला नंतर साडी-चोळीचा आहेर केला जातो. यंदा मात्र, परिसरात चांगला पाऊस असल्याने केवळ ओढ्याच्या काठावर उभे राहून हातवारे करत कलकलाट करावा लागला. सुमारे अर्धा तास हा शिव्यांचा बार रंगला होता. ओढ्यात पाणी होते. या पाण्यात उतरून हाताने दुसऱ्या महिलांच्या अंगावर पाणी उडविण्यात येत होते. या बोरीच्या बारमुळे बोरी आणि सुखेड या दोन्ही गावांना यात्रेचे स्वरूप आले होते. लहान मुलांसाठी खेळणी, मिठाईची दुकाने थाटली गेली होती.
सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले व सहकाऱ्यांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. (वार्ताहर)
पाणी अंगावर शिंपत शिव्या
महिलांनी बोरीचा बार घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसात महिला बोरीचा बार घालत होत्या. ओढ्यातील पाणी अंगावर शिंपत हातवारे करून महिला शिव्या देत होत्या. दुसरीकडे महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शिव्या देणाऱ्या महिलांना आवरणे कठीण झाले होते.