पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रारींचा अभाव

By Admin | Updated: September 23, 2014 23:56 IST2014-09-23T22:23:31+5:302014-09-23T23:56:51+5:30

केवळ उपक्रमांच्या कौतुकाचा वर्षाव-नाव उघड होईल याचीच भीती

Lack of complaints on the police's WhatsApp advertisement | पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रारींचा अभाव

पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रारींचा अभाव

दत्ता यादव - सातारा -आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी व मतदारांना प्रलोभने दाखविणाऱ्या राजकीय मंडळींना रोखण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा निर्णय घेतला. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आचारसंहितासंदर्भात माहिती देण्याचे पोलिसांनी आवाहन केले होते. मात्र, सध्या पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ चांगल्या उपक्रमांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
व्हॉट्सअ‍ॅपची हेल्पलाईन सुरू करून चार दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप एकही तक्रार व्हॉट्सअ‍ॅपवर आली नाही. केवळ हा उपक्रम चांगला आहे. अशा प्रकारच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया लोकांमधून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू न झाल्यामुळे लोकांमधून तक्रारीसंदर्भातला ओढा कमी असेल, असे पोलिसांना वाटतेय. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पोलिसांनी आचारसंहिता भंगाची माहिती देण्यासाठी केवळ दूरध्वनी क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. व्हॉट्सअ‍ॅप जवळपास सर्वच लोक आता वापरत आहेत. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. यामध्ये युवक, युवती आणि वयोवृद्धांचाही मोठा सहभाग असतो. हे ओळखून पोलिसांनी नवा फंडा अवलंबला आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे.आचारसंहिता भंग होईल, असे वाटणाऱ्या कोणत्याही घटनेचे फोटो, व्हिडीओ किंवा माहिती या व्हॉट्सअ‍ॅपवर पोलिसांना शेअर करू शकतात.

नाव उघड होईल याचीच भीती
पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर आचारसंहिता भंगाची माहिती नागरिकांसाठी खुली केली असली तरी एखाद्याने पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एखादी माहिती पाठविली. आणि ती माहिती कोणी पाठविली. हे त्या व्यक्तीला समजले तर विनाकारण वाद वाढण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवली जात आहे. पोलिसांचे आणि राजकीय लोकांचे लागेबांधे असतात. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केलेली माहिती कोणी दिली, याचे नाव उघड होण्याची भीती काही नागरिकांना आहे. त्यामुळे पोलिसांच्या या हेल्पलाईनला अद्याप चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Lack of complaints on the police's WhatsApp advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.