कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्रजी अवतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:17+5:302021-06-16T04:51:17+5:30
सातारा : ‘गिरीश कुबेर यांनी लिहिलेले रेनिसान्स स्टेट हे पुस्तक इतिहासपुरुषांची बदनामी करणारे आहे. कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्रजी अवतार ...

कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्रजी अवतार
सातारा : ‘गिरीश कुबेर यांनी लिहिलेले रेनिसान्स स्टेट हे पुस्तक इतिहासपुरुषांची बदनामी करणारे आहे. कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्रजी अवतार आहेत. त्यांच्या या पुस्तकावर राज्य शासनाने तत्काळ बंदी घालावी व कुबेरांवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोकाटे म्हणाले, ‘दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवराय यांचे गुरू नव्हते, हे शासन नियुक्त वसंत पुरके समितीने सिद्ध केले आहे. हा वैचारिक वाद महाराष्ट्रात सात वर्षे सुरू होता. रेनिसान्स स्टेट या पुस्तकात कोंडदेव यांचा संबंध शिवरायांशी जोडला आहे. कुबेरांची मांडणी छत्रपती शिवराय- राजमाता जिजाऊ, शाहू महाराज, राजाराम महाराज यांची बदनामी करणारी आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून सनातनी व्यवस्थेला देणे हा कुबेरांचा उद्देश आहे. संशोधनाचे कोणतेही नियम न पाळता लेखणी उचलून खरडपट्टी करण्याची कुबेरांची पद्धत आहे. कुबेरांची ही मांडणी संघी विकृतीने भरली असल्याची टीका कोकाटे यांनी केली.
या पुस्तकात संत रामदास, टिळक, सावरकर, हेडगेवार, गोळवलकर यांचे विस्ताराने कौतुक केले आहे. मात्र, चक्रधर बसवेश्वर, संत तुकाराम महाराज, महर्षी वि. रा. शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव भोसले, अण्णा भाऊ साठे यांचा साधा उल्लेख पण करत नाहीत, महाराष्ट्राच्या पुनर्जागरामध्ये यांचा काही वाटा नाही असे कुबेरांना वाटते काय, असा सवाल कोकाटे यांनी केला.
सरकारने या पुस्तकावर बंदी घालून कुबेर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कोकाटे यांनी केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करुन पुस्तकाला विरोध केला जाईल. या पुस्तकाच्या संदर्भात आपण स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांना भेटणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत उपस्थित होते.