कृष्णेच्या डोहात जलपर्णीचा कालिया!

By Admin | Updated: June 24, 2016 01:12 IST2016-06-23T23:43:32+5:302016-06-24T01:12:31+5:30

प्रशासन सुस्त : भुर्इंज परिसरात वनस्पती हटविण्यासाठी सरसावली तरुणाई; सामाजिक संघटनेचा पुढाकार--स्वच्छ व्हावी कृष्णामाई...

Krishna's daughter drink water! | कृष्णेच्या डोहात जलपर्णीचा कालिया!

कृष्णेच्या डोहात जलपर्णीचा कालिया!

भुर्इंज : येथील कृष्णा नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीचे मूळ स्वरूपच हरवून गेले आहे. जलपर्णीच्या विळख्यामुळे अनेक भागांमध्ये नदीपात्रातील पाण्याचे दर्शनही होत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून कोणी आवाहन करण्याची प्रतीक्षा न करता येथील प्लस पॉइंट ग्रुपने भुर्इंज परिसरातील नदीपात्रातील जलपर्णी हटवण्याचे काम स्वयंस्फूर्तीने हाती घेतले आहे. मात्र, त्यांच्या या कामाला प्रशासकीय पातळीवर पाठबळ मिळत नसल्याने या कामाला आवश्यक गती मिळत नाही.
भुर्इंजला कृष्णा नदीकाठी असणारे बांधिव घाट, त्या शेजारी महालक्ष्मी मंदिर आणि भृगुऋषी मठ तसेच पात्रालगत असणारी गर्द हिरवाई यामुळे या ठिकाणी कृष्णा नदीचा डौल काही वेगळाच; मात्र या दृष्याला गेल्या काही दिवसांपासून नजर लागली असून, कृष्णा नदीचे पात्रच हरवू लागले आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या जलपर्णीमुळे नदीपात्राची अवस्था भीषण झाली आहे. जलपर्णीमुळे पात्रातील मासेही अनेकदा मृत होतात. काही दिवसांपूर्वी येथील प्लस पॉइंट ग्रुपने भुर्इंज परिसरातील नदीपात्रात जलपर्णी हटाव मोहीम राबविण्यास सुरुवात केली. कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेची सुरुवात भुर्इंजपासून केली.
या मोहिमेत सहभागी झालेल्या राहुल शेवते, गणेश दीक्षित, प्रथमेश शिंदे, अक्षय शेवते, नीलेश दीक्षित, अमोल राऊत, अमित शिर्के, प्रसाद शेवते, अभिमन्यू निंंबाळकर, नंदकिशोर निंंबाळकर, प्रसन्न शेवते, विश्वजित साळुंखे, अभिषेक भुजबळ, स्वप्नील शेवते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेकडो टन जलपर्णी पात्रातून बाहेर काढली; मात्र जलपर्णीचा विळखा पुन्हा प्रचंड वेगाने पात्राला पडत असल्याने या कामाला अधिक बळ मिळण्याची गरज आहे.
त्यांच्या कामाला प्रशासकीय मदत मिळाली तर काम अधिक व्यापक आणि ठोस होणार आहे. नदीपात्र जलपर्णीमुक्त होण्याआधी या पात्राचा वरील भाग आधी जलपर्णीमुक्त होणे आवश्यक आहे. अन्यथा येथील जलपर्णी हटवली तरी वरून येणाऱ्या जलपर्णीमुळे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)


कऱ्हाडला जलपर्णीच्या तावडीतून कृष्णेची सुटका!
पालिकेचा पुढाकार : आठ दिवस राबविली मोहीम; बोटीचा वापर

कऱ्हाड : येथील कृष्णा नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णींमुळे नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत होते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांसह शहरातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत होते. पालिकेने पुढाकार घेऊन शहरातील सांडपाण्यामुळे नदीपात्रात वाढत असलेल्या जलपर्णी काढल्या व कृष्णानदी पात्र स्वच्छ केले.
कऱ्हाड ते टेंभूपर्यंत मोठ्या प्रमाणात सांडपाण्यामुळे जलपर्णींचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नागरिकांसह नगरसेवकांकडून दूषित पाण्याबाबत पालिका प्रशासनावर मासिक सभेमध्ये धारेवर धरले जात होते. याशिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही नदीप्रदूषणाबाबत पालिकेस अनेक वेळा नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. याचा विचार करत नदीप्रदूषणावर योग्य तोडगा काढत सुरुवातीला नदीतील जलपर्णी काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला व जलपर्णी काढल्या.
कृष्णा-कोयना नदीपात्रात गोवारे हद्दीपर्यंत फोफावलेली जलपर्णी काढण्यात आली. येथील जुन्या कोयना पुलापासून गोवारे हद्दीपर्यंत सुमारे तीसहून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णींनी नदीपात्राला वेढलेले होते. जलपर्णीची झपाट्याने होणारी वाढ व त्यामुळे होत असलेले दूषित पाणी त्याचा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत पालिकेने आठ दिवस यांत्रिक बोटींच्या साह्णाने कृष्णा-कोयना पात्रातील जलपर्णी काढल्या. पालिकेतील आरोग्य विभागातील पाच कर्मचाऱ्यांसह कोल्हाटी समाजातील वीस युवकांनी सलग आठ दिवस नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पूर्ण केले.
जलपर्णींचा पालिकेचे आरोग्य अभियंता ए. आर. पवार यांनी कर्मचाऱ्यांसमवेत यांत्रिक बोटींतून सर्व्हे देखील केला. शिवाय नदीपात्रात वाढत असलेल्या जलपर्णीची नगराध्यक्षा संगीता देसाई, उनगराध्यक्ष सुभाष पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, एम. सी. बागवान, नगरसेविका अरुणा जाधव, सिद्धार्थ थोरवडे आदींनी नदीकाठी जाऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Krishna's daughter drink water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.