कऱ्हाडच्या कृष्णाबाईची यात्रा कोरोनामुळे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:15+5:302021-05-03T04:34:15+5:30
कऱ्हाड : येथील ग्रामदेवता श्री कृष्णाबाईची चैत्रातील यात्रा रद्द झाली आहे. कोरोनामुळे होणारी यात्रा रद्द झाली असून, केवळ पूजेची ...

कऱ्हाडच्या कृष्णाबाईची यात्रा कोरोनामुळे रद्द
कऱ्हाड : येथील ग्रामदेवता श्री कृष्णाबाईची चैत्रातील यात्रा रद्द झाली आहे. कोरोनामुळे होणारी यात्रा रद्द झाली असून, केवळ पूजेची परवानगी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी या यात्रेला प्रारंभ झाला. दरवर्षी ही चैत्री यात्रा उत्साहात आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरी केली जाते. यात्रेनिमित्त कृष्णाबाईची पालखी निघते. या पालखीची नगरप्रदक्षिणा घातली जाते, तसेच ठिकठिकाणी महिला या पालखीचे पूजन करतात. मंदिरामध्ये विविध आध्यात्मिक कार्यक्रम होतात. मात्र, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली.
तीन बहीण-भावांचे एकाचवेळी रक्तदान
कऱ्हाड : येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पूर्वा बेडेकर, अभिषेक बेडेकर व तन्मय बेडेकर या तीन बहीण भावंडांनी एकाचवेळी रक्तदान केले. १ मेपासून अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन ते तीन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णांना रक्त पुरवठा करताना अडथळे येणार आहेत. याचा विचार करून जैन समाजाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरामध्ये बेडेकर बहीण भावंडांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. त्याबद्दल जैन समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
नियमांचे उल्लंघन; तांबवेत कारवाई
तांबवे : येथील काही व्यापारी व ग्रामस्थ कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे काही दुकाने, तसेच बाजारपेठेत काही भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. एका डॉक्टरवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. तांबवे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच काहीजण नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ग्रामपंचायतीकडून देण्यात आला असून, ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सरपंच शोभा शिंदे व उपसरपंच विजयसिंह पाटील यांनी केले आहे.