‘कोविड’चे नियम पाळून कृष्णाबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:14+5:302021-02-06T05:14:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाई : ‘कोविडचे नियम पाळून या वर्षीचा कृष्णाबाई उत्सव साजरा करावा. आपल्या उत्सवाला साडेतीनशे वर्षांची परंपरा ...

Krishnabai following the rules of ‘Kovid’ | ‘कोविड’चे नियम पाळून कृष्णाबाई

‘कोविड’चे नियम पाळून कृष्णाबाई

लोकमत न्यूज नेटवर्क

वाई : ‘कोविडचे नियम पाळून या वर्षीचा कृष्णाबाई उत्सव साजरा करावा. आपल्या उत्सवाला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. ती खंडित होऊ नये म्हणून सर्वांनी नियम पाळून हा उत्सव साजरा करावा,’ असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी केले.

वाई शहरातील सात घाटावर माघ शुद्ध प्रतिपदा दि. १२ फेब्रुवारी ते फाल्गुन पौर्णिमा दि. २४ मार्च या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या कृष्णाबाई उत्सवासंदर्भात मार्गदर्शनासाठी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर, पालिका निरीक्षक नारायण गोसावी आणि कृष्णाबाई संस्थानचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

वाई शहरात शिवाजी महाराजांच्या काळापासून परंपरेने साजरा होणारा कृष्णाबाई उत्सव या वर्षी ‘कोविडं'चे नियम पाळून साजरा करावा. या वर्षी कोणत्याही घाटावर मंडप उभारता येणार नाही. उत्सवात रोज होणारे पूजाअर्चा, लघुरुद्र, आरती, आदी धार्मिक विधी मर्यादित लोकांमध्येच पार पाडावेत. भजन, कीर्तन, गायन, करमणूक, हळदी-कुंकू, महाप्रसाद कार्यक्रम, छबिना मिरवणूक व रथोत्सव करता येणार नाही. कृष्णामातेचे खुले दर्शन घेता येणार नाही. दर्शनासाठी गर्दी जमवता येणार नाही. त्यासाठी समाजमाध्यमांचा पर्याय वापरता येईल काय, याची चाचपणी करावी. कृष्णामातेचे ओटीभरण, नैवेद्यालाही बंदी राहील. कृष्णाबाई संस्थान यांच्यावतीने माधवराव तावरे, विवेक पटवर्धन, सतीश शेंडे, कौस्तुभ वैद्य, चरण गायकवाड, विश्वास पवार, आदींनी आपली भूमिका मांडली.

चौकट..

अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे

या बैठकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्याकडून भाविकांना दर्शन खुले करण्याबाबत अभिप्राय मागविण्यात येईल, असे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले व पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी सांगितले.

Web Title: Krishnabai following the rules of ‘Kovid’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.