कृष्णरावांनी आणलं प्रशासनाला घाईला!
By Admin | Updated: November 9, 2014 23:27 IST2014-11-09T22:46:41+5:302014-11-09T23:27:22+5:30
कृष्णरावांनी पोलिसांनाच अडचणीत आणल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनीही त्यांचा नाद सोडून दिला

कृष्णरावांनी आणलं प्रशासनाला घाईला!
सातारा : कृष्णराव फाळके यांनी आपला मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयातच हलविल्यामुळे संपूर्ण प्रशासन त्यांना त्रासले आहे. कार्यालयात आत कुठेही रिकामी जागा दिसली की ते आता मस्तपैकी ताणून देत आहेत. विशेष म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव मुठाणे यांना एक पत्र लिहून कृष्णरावांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे. मात्र, कृष्णरावांनी पोलिसांनाच अडचणीत आणल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनीही त्यांचा नाद सोडून दिला आहे.
गेली आठ वर्षे त्यांचे आंदोलन सुरुच असून कृष्णरावांनी चार जिल्हाधिकाऱ्यांपुढे आपले गाऱ्हाणे मांडले असून आता अश्विन मुदगल यांनी तरी त्यांचा प्रश्न सोडवावा या आशेवर त्यांनी आपला ठिय्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिला आहे. विशेष म्हणजे रविवारी तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य इमारतीतच अगदी भर दुपारी मस्तपैकी ताणून दिली होती.
खटाव तालुक्यातील ललगुणनजीक असणाऱ्या एका वाडीतील जमिनीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने कृष्णराव फाळके जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. हा विषय न्यायप्रविष्ठ असला तरी तो जिल्हा प्रशासनानेच सोडवावा, या मागणीवर ते ठाम आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी सुबराव पाटील, विकास देशमुख, संभाजी कडू-पाटील, डॉ. रामास्वामी एन. यांनाही त्यांनी अगदी भंडावून सोडले होते. आता या मागणीसाठी कृष्णराव यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्यास सुरू केले आहे.
दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी फाळके यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून हा विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे कृष्णराव फाळके यांना उपोषण मागे घेण्याविषयी सांगितले होते. मात्र, फाळके कुटुंबाचेही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी उपोषण सुरुच ठेवले. (प्रतिनिधी)
फाळकेंनी दिला होता पोलिसाला प्रसाद
कृष्णराव फाळके यांचे उपोषण सुरू असतानाच सकाळी अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अनेक अधिकाऱ्यांच्या गाड्या ते अडवायचे. त्यामुळे अधिकारीही त्यांना चुकवून जायचे. त्यांचे उपोषण सुरू असतानाच प्रवेशद्वारावरच सकाळी एक आंदोलन झाले. येथे त्यांना एक मल्लाने पन्नास रुपये दिले आणि पोलिसांविषयी गरळ ओकली. यामुळे संतापलेल्या कृष्णरावांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडविली आणि माझा प्रश्न सोडविला तरच आत जाऊ देणार नाहीतर नाही, असा इशारा दिला. याचवेळी उपोषणस्थळी बंदोबस्तास असणारा पोलीस कर्मचारी मध्ये पडला तर त्यालाही फाळके यांनी आपल्या हातातील काठीने प्रसाद दिला.
वडापाव खाऊन उपोषण
आठ वर्षांपूर्वी कृष्णराव फाळके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होते. त्यांचा विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे प्रशासनही त्यावर काही करू शकत नव्हते आणि माझा प्रश्न प्रशासनानेच निकालात काढावा, यावर ते त्यावेळीही ठाम होते आणि आजही ठाम आहेत. त्यांनी प्राणांतिक उपोषण असल्याची घोषणा करतच उपोषण सुरू केले, मात्र थोड्याच दिवसात त्यांना एका गाड्यावर वडापाव खातांना छायाचित्रकारांनी टिपले आणि त्याची बातमीही प्रसिध्द झाली. दिवसा जिल्हाधिकारी कार्यालय आणि रात्री मात्र कोणत्यातरी वडापावच्या गाड्यावर मस्तपैकी वडापावर ताव मारणे असा त्यांचा दिनक्रम ठरला होता.
पोलिसाकडूनच केले पाचशे वसूल...
काही दिवसांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांनी कृष्णराव यांच्या नातेवाइकांना बोलावून त्यांना घरी घेऊन जा असे सांगितले होते. त्यांनी जीपमध्ये घालून घरी नेले. मात्र, पुन्हा ते दुसऱ्या दिवशी येथे दाखल झाले. यानंतर दोनच दिवसांनी त्यांना पोलिसांच्या गाडीतून घरी सोडले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी मला घरी सोडताना पोलिसांनीच माझे पाचशे रुपये घेतले असा आरोप केला. यावेळी त्यांची समजूत काढताना प्रशासनाच्याही नाकीनऊ आले. मात्र, कृष्णराव हटले नाहीत. त्यांनी पोलिसांकडूनच पाचशे रुपये वसूल केले आणि मगच शांत झाले. ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच दिली.