शेकडो दिव्यांनी उजळला कृष्णा घाट
By Admin | Updated: November 6, 2014 23:00 IST2014-11-06T22:17:08+5:302014-11-06T23:00:16+5:30
वाईत दीपोत्सव : दीपमाळ प्रज्वलित; नदीपात्रात सोडले हजारो दिवे

शेकडो दिव्यांनी उजळला कृष्णा घाट
वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईनगरीतील कृष्णा नदीतीरावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लावण्यात आलेल्या शेकडो दिव्यांनी कृष्णाघाट उजळून निघाला. या दीपोत्सवाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
वाईच्या दीपोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. याबाबत आख्यायिका अशी की, शंकराने त्रिपुरा सुराचा वध त्रिपुरा पौर्णिमेदिवशी केला. चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी दीपोत्सव साजरा केला जातो. तसेच कार्तिक शुद्ध पौर्णिमेला शिव व विष्णू यांची भेट होते. म्हणून त्यावेळी बेल आणि तुळशीची पाने वाहिली जातात.
दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वाई येथील कृष्णा घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. गुरुवारी सायंकाळी मंदिरासमोरील दगडी दीपमाळ प्रज्वलीत करण्यात आली.
वाई शहरातील नागरिकांनी घाटावर येऊन द्रोणात दिवे प्रज्वलित करून ते नदीपात्रात सोडले. यामुळे लखलख चंदेरी दुनियेत प्रवेश केल्याचा भास निर्माण झाला होता. तेजानं न्हाऊन निघालेला परिसर मोहित करत होता. (प्रतिनिधी)
सातही घाटांवर उजळले दीप
वाईत कृष्णा नदीवर सात घाट असून प्रत्येक घाटावर कृष्णामाई संस्थानच्या वतीने दिवे प्रज्वलित केले जातात. महागणपती घाटावरील काशीविश्वेश्वर व फुलेनगरला भद्रेश्वराचे पूजन करण्यात आले. येथील शंकराच्या मंदिरात सातशे पन्नास दीप उजळविण्यात आले. घाटावर सर्व ठिकणी संस्थानच्या वतीने दीपोत्सव केला जातो. यावेळी नागरिक विशेषत: महिला भाविक मोठ्या संख्येने कृष्णा घाटावर जमले होते. त्यांनी नदीपात्रात दिवे प्रज्वलित करून सोडले. या दीपोत्सवाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.