वाईकरांच्या पुढाकारातून कृष्णा बनली पावन !

By Admin | Updated: June 20, 2016 00:18 IST2016-06-20T00:18:41+5:302016-06-20T00:18:41+5:30

नदीतून शेकडो टन कचरा हद्दपार : प्रशासन, लोप्रतिनिधीसह सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग

Krishna became the pioneer in the initiative of wikar | वाईकरांच्या पुढाकारातून कृष्णा बनली पावन !

वाईकरांच्या पुढाकारातून कृष्णा बनली पावन !

 वाई : वाई नगरपालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रविवारी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधीसह विविध सामाजिक संस्था आणि शेकडो नागरिकांनी कृष्णा नदीची स्वच्छता केली. नदीपात्रातून शेकडो टन कचरा काढण्यात आला. त्यामुळे स्वच्छ वाहते कृष्णामाई असे चित्र निर्माण झाले आहे.
या स्वच्छता अभियानाचा प्रारंभ आमदार मकरंद पाटील, प्रांत अस्मिता मोरे, नगरपालिका मुख्याधिकारी आशा राऊत, नगराध्यक्ष भूषण गायकवाड, पंचायत समिती सभापती उमा बुलुंगे, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रशासनाने सामाजिक संस्था व नागरिकांचे वेगवगळे गट तयार करून कृष्णा नदीवरील सात घाटांवर एकाच वेळी स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला.
गंगापुरी घाटावर समूह संस्था, टीम आॅक्सिजन व कृष्णामाई संस्थान, मधली आळी हिंदुस्थान प्रतिष्ठान, भगवा कट्टा प्रतिष्ठान, गणपती आळी घाट, ज्येष्ठ नागरिक केंद्र, सहयोग ध्यान केंद्र, नानासाहेब धर्माधिकारी संस्था, महागपती घाट अनिरूध्द उपासना फाउंडेशन, जनविकास प्रतिष्ठान, रोटरी क्लब, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धर्मपुरी घाट आर्ट आॅफ लिव्हींग, पतंजली योग समिती, आस्था संस्था, सुयश प्रतिष्ठान, असंघटित महिला संस्था व नागरिक, भीमकुंड आळीत महिला गु्रप, कृष्णामाई संस्थान भीमकुंड आळी, रविवार पेठ व सोनगिरवाडी स्मशानभूमी परिसरात दोन जेसीबी, सात ट्रक व सर्व कर्मचारी या घाटावर स्वच्छता करीत होते़
जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर, डंपर व इतर स्वच्छतेचे साहित्य उपलब्ध करण्यात आले होते़ गवत, प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू गोळा करून सोनापूर कचराडेपोत टाकण्यात आले. तसेच जेसीबी, पोकलेनच्या साह्याने प्रत्यक्ष नदीपात्रातील घाण, जलपर्णी काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे़ (प्रतिनिधी)

कृष्णा नदीला सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व असून तिचे पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे़ नदी अस्वच्छ होण्याची अनेक कारणे असून त्यांची सोडवणूक केली जाणार आहे़ त्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता भासू देणार नाही़ या अभियासाठी वाईकरांचे मोलाचे सहकार्य आहे.
- आ़ मकरंद पाटील
वाई हे एक पर्यटनाचे ठिकाण असून कृष्णा नदी व त्यावरील सात घाट तसेच विविध मंदिरे ही वाईची भूषणे आहेत़ यांची स्वच्छता राखणे व त्यांचा विकास करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.़
- भूषण गायकवाड, नगराध्यक्ष, वाई
आम्ही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी कार्यरत असून महिन्यातील दोन रविवारी वेगवेगळ्या घाटांवर स्वच्छता अभियान चालू असते. स्वच्छता अभियानात अजून मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला पाहिजे.
- दिलीप डोंबिवलीकर, सामाजिक संस्था
कृष्णा नदी स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व आ़ मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनुसार प्रत्यक्ष स्वच्छता अभियाचे नियोजन केले होते. कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे़
- आशा राऊत, मुख्याधिकारी, वाई नगरपालिका

Web Title: Krishna became the pioneer in the initiative of wikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.