कृषिकन्येनं बनवलं टाकाऊ पाईपपासून टिकाऊ हातयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST2021-09-08T04:46:33+5:302021-09-08T04:46:33+5:30

सातारा : दापोली कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या अबोली संजय भागडे हिने ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ...

Krishikanye made durable hand tools from waste pipes | कृषिकन्येनं बनवलं टाकाऊ पाईपपासून टिकाऊ हातयंत्र

कृषिकन्येनं बनवलं टाकाऊ पाईपपासून टिकाऊ हातयंत्र

सातारा : दापोली कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या अबोली संजय भागडे हिने ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतातील टाकाऊ पाईपपासून शून्य खर्चात उसाचे पाचट काढणी हातयंत्र बनवले. चिमणगाव, ता. कोरेगाव येथील कृषिकन्येच्या या हातयंत्राची सध्या तालुक्यात चर्चा होत असून, शेतकऱ्यांना हे यंत्र फायदेशीर ठरत आहे.

या हातयंत्राने पाचट काढल्याने लोकरी माव्याचे करता येणारे नियंत्रण, शेतातच तयार होणारे सेंद्रिय खत, ऊस उत्पादनात होणारी वाढ, ऊसाच्या वेगवेगळ्या जातीमध्ये पाचट काढण्याचे होणारे फायदे आणि घ्यावयाची काळजी आदी गोष्टींचे मार्गदर्शन अबोली भागडे ही शेतकऱ्यांना करत आहे. या उपक्रमासाठी तिला कृषी महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महाडकर, डॉ. थोरात, कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेमहाडिक आदींचे मार्गदर्शन लाभले.

पाचट अच्छादन केल्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो व जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे या बिनखर्चाच्या पाचट काढणी हातयंत्राचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन अबोली भागडे हिने केले आहे.

(चौकट)

कमी वेळात जास्त काम...

केवळ दोन फूट लांबीच्या टाकाऊ पाईपपासून बनवलेल्या या पाचट काढणी हातयंत्रामुळे कमी वेळेत जास्त काम करता येते. कामाची गुणवत्ता वाढते. एकूण मजुरांवरील खर्च कमी होतो. उसाच्या पानांमुळे हाताला जखमा होत नाहीत आणि पाचट काढल्याने हवा खेळती राहते. त्यामुळे ऊसाची जाडी वाढण्यास मदत होते. पाचट काढल्यामुळे कांडी कीड, लोकरी मावा तसेच पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

फोटो : ०७ सुरूची

दापोली कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या अबोली संजय भागडे हिने टाकाऊ पाईपपासून ऊसाचे पाचट काढणी यंत्र बनवले आहे.

Web Title: Krishikanye made durable hand tools from waste pipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.