कोविड काळ सक्त... ‘एससीडी’ने राखला तक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:01+5:302021-02-13T04:38:01+5:30

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पुढं नेमकं काय होणार याबाबत कोणालाही काहीही अंदाज नव्हता. पण, महिनाभर सातारकर घरातच अडकून पडले म्हटल्यावर ...

Kovid Kaal Sakt ... SCD maintains the table! | कोविड काळ सक्त... ‘एससीडी’ने राखला तक्त!

कोविड काळ सक्त... ‘एससीडी’ने राखला तक्त!

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पुढं नेमकं काय होणार याबाबत कोणालाही काहीही अंदाज नव्हता. पण, महिनाभर सातारकर घरातच अडकून पडले म्हटल्यावर उद्योजक संग्राम बर्गे यांच्यासह विनीत पाटील आणि सादिक शेख यांनी निवडक लोकांशी फोनवर संवाद साधून मदतीसाठी ग्रुप करण्याचं ठरवलं. त्यानुसार २३ एप्रिल २०२० ला या ग्रुपची स्थापना करण्यात आली. शासनाचे निर्णय, लॉकडाऊनच्या काळातील अफवा, पोलिसांचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांचे मत यासह सर्वच बाबत प्रचंड गोंधळ सुरू होता. या गोंधळातून सातारकरांसह परजिल्ह्यातून आणि परराज्यांतून येणाऱ्याची संख्या वाढत होती. साताऱ्यात अडकलेल्या कोणाच्या असाहाय्यतेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये या विचाराने ग्रुपमधील सदस्य काम करू लागली. प्रत्येकाने स्वत:च्या ओळखीने काम करणारे हात ग्रुपमध्ये वाढविले आणि २७ वरून या ग्रुपच्या सदस्यांची संख्या २३१ पर्यंत पोहोचली.

कोविडसारख्या आपत्तीचा पहिल्यांदाच सामना करणाऱ्या प्रशासनाला सातारा कोविड डिफेंडर ग्रुपने साहाय्य करण्याचा जसा प्रयत्न केला, तसंच यंत्रणेतील त्रुटींवरही बोट ठेवून त्यात सुधारणा होईपर्यंत पाठपुरावाही केला. अनेकदा यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे कामही ग्रुपच्या सदस्यांनी केलं. जेव्हा अवघं जग संसर्गाच्या भीतीने घरात होतं तेव्हा दुर्लक्षित घटकांपर्यंत सोय पोहोचविण्याचं बळ कुठून आलं या प्रश्नावर ग्रुपचे सदस्य म्हणतात...‘व्ही लव सातारा’!

पॉईंटर :

२७ स्वयंसेवी संस्थांचे एकाच वेळी कार्य

१३ टन अन्न धान्याचे वाटप

१८० हून अधिक रेमडिसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिले

२५ मोफत रेमडिसीवर इंजेक्शन गरजूंसाठी

३००० अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न

१५०० परप्रांतीयांच्या घर वापसीसाठी प्रयत्न

१०,००० हून अधिक गरजूंच्या जेवणाची सोय

१३०० हून अधिक नातेवाइकांना मृत्युदाखले मिळवून दिले

३५ ॲक्सिजन मशीन गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी

... यांचा मोठा वाटा!

सातारा कोविड डिफेंडर ग्रुपची स्थापना विनीत पाटील, संग्राम बर्गे आणि सादिकभाई शेख यांच्या संकल्पनेतून साकारली. राजकारणविरहित असलेल्या या समूहात जिल्ह्यातील तब्बल २३१ जण सहभागी आहेत. कोविड काळात जयश्री पार्टे-शेलार, प्राची मोरे यांच्यासह शशिकांत पवार, रोहित सावंत सरदार, कन्हैय्या राजपुरोहित, प्रशांत मोदी, किशोर शिंदे, अमोल मोहिते, हर्षल चिकणे, मजिद कच्छी, गणेश नलवडे, अक्षय गोरे, डॉ. किरण जगताप, गणेश पालकर, इर्शाद बागवान, रवी पवार, नीलेश पाटील, भागवत कदम, विरेन जानी, मेजर प्रज्ञा पार्टे, मेजर अमेय देशमुख, संजय बोराटे, प्रशांत नलवडे या मंडळींनी कोविड काळात घड्याळ न बघता काम केले. गरजूंना अन्नवाटप करताना काहींनी मारही खाल्ला!

साताऱ्यातून थेट गाठलं जालना!

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर प्रवासात असलेले जालन्याचे एक कुटुंब चक्क साताऱ्यातच राहिले. खिशात असलेले पैसे संपल्यानंतर त्यांना जालना गाठण्याएवढे पैसेही नव्हते. याची माहिती हस्ते परहस्ते ग्रुपला मिळाल्यानंतर त्यांचा पास करण्यापासून त्यांना म्हसवडपर्यंत पोहोचवून तिथून पुढे जालना गाठेपर्यंत ग्रुपच्या सदस्यांनी फॉलोअप घेतला. जंबो कोविड हॉस्पिटलच्या कामाला गती आली ते ग्रुपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने! प्रशासकीय पातळीवरील यंत्रणा हादरली आणि रेंगाळेलेले काम तातडीने मार्गी लागले.

Web Title: Kovid Kaal Sakt ... SCD maintains the table!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.