कोठावळेंच्या दुसऱ्या ‘पीए’नेही पदभार सोडला!
By Admin | Updated: April 28, 2015 00:19 IST2015-04-27T23:12:21+5:302015-04-28T00:19:02+5:30
कार्यकर्त्यांकडून अपमानास्पद वागणूक : अधिकारी म्हणतात... तुम्हीच ‘पीए’चे नाव सुचवा

कोठावळेंच्या दुसऱ्या ‘पीए’नेही पदभार सोडला!
सांगली : जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्ते आणि काही माजी सभापतींकडून त्यांच्या ‘पीए’ला (स्वीय सहायक) अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. यातूनच सहा महिन्यात कोठावळे यांच्याकडील दोन स्वीय सहायकांनी पदभार सोडल्यामुळे अधिकाऱ्यांनाही त्यांच्याकडे कोणता स्वीय सहायक द्यावा हे कळत नाही. म्हणूनच सोमवारी अधिकाऱ्यांनीही, सभापती साहेब त् ाुम्ही सांगाल तो स्वीय सहायक देण्यात येईल, असे सांगून नाव सुचवण्याची विनंती केली आहे. यामुळे सभापतींच्या ‘पीए’चा विषय आता चांगलाच चर्चेचा बनला आहे.
जिल्हा परिषदेतील सभापती, उपाध्यक्ष, अध्यक्षांना ‘पीए’ आणि शिपायांची पदे मंजूर आहेत. बहुतांशी सभापतीही स्वीय सहायकांना चांगलीच वागणूक देत असल्यामुळे ते कधीही पदभार सोडत नाहीत. उलट सभापतींकडे नेमणूक होण्यासाठी अनेक कर्मचारी नेत्यांकडे फिल्डिंग लावतात.
परंतु, गेल्या वर्षभरापासून पदाधिकाऱ्यांपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वीय सहायक आणि तेथील इतर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. जेवणावळ्यापासून ते चहा, अन्य सुविधा देण्यापर्यंत स्वीय सहायकांकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातूनच, सभापतींकडे स्वीय सहायक नको रे बाबा, अशा कर्मचाऱ्यांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
हाच अनुभव सध्या बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे यांच्याबाबतीत येत आहे. कोठावळे हे शांत आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणारे आहेत. यांच्याबद्दल कोणत्याही स्वीय सहायकांच्या तक्रारी नाहीत. पण, त्यांच्याकडे येणारे काही कार्यकर्ते स्वीय सहायकांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. यात माजी सभापतींचाही मोठा वाटा
आहे.
सहा महिन्यात दोन स्वीय सहायकांनी पदभार सोडल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत. सभापतींनी स्वीय सहायक देण्याची अधिकाऱ्यांकडे मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी, तुम्हीच स्वीय सहायकाचे नाव सुचवावे, त्यांचा तात्काळ नियुक्ती आदेश दिला जाईल, असे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मला काम करायचे नाही...
दोन दिवसांपूर्वी एका माजी सभापतीने सध्याच्या स्वीय सहायकास एकेरी भाषा वापरून त्याचा अपमान केला. लगेच त्या स्वीय सहायकाने सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना, मला कार्यालयीन कामकाज करायचे आहे. मी तेथे स्वीय सहायक म्हणून काम करणार नसल्याचे सांगितले. यापूर्वीही कोठावळे यांच्याकडील एका स्वीय सहायकाने पदभार सोडला आहे.