कोरेगाव नगरपंचायतीचे कर्मचारी आजपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST2021-06-04T04:30:32+5:302021-06-04T04:30:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कोरोनाकाळात अहोरात्र काम करूनदेखील चार महिन्यांपासून नगरपंचायतीने पगार न केल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन ...

कोरेगाव नगरपंचायतीचे कर्मचारी आजपासून संपावर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : कोरोनाकाळात अहोरात्र काम करूनदेखील चार महिन्यांपासून नगरपंचायतीने पगार न केल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दि. ४ जूनपासून सर्वच विभागांचे काम बंद ठेवले जाणार आहे, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजित बर्गे यांनी दिली.
नगरपंचायत कर्मचारी संघटनेची व्यापक बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. त्यामध्ये काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या संदर्भात संघटनेने प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, उपनगराध्यक्षा मंदा बर्गे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांना निवेदन सादर केले असून, त्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून पगार न केल्याने आंदोलन छेडत असल्याचे म्हटले आहे.
कोविड हॉस्पिटलमध्ये काम करणे, कोरोनाकाळात शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे, आदी कामे करत असताना देखील सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत असून, अवहेलना केली जाते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे खाण्यासाठी अन्न नाही, त्याची कोणालाही फिकीर नसल्याने अखेरीस संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बर्गे यांनी म्हटले आहे.