कोरेगावात प्रशासनाकडून शुक्रवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:49+5:302021-09-03T04:41:49+5:30
कोरेगाव : तालुक्यातील जरंडेश्वर मारुती देवस्थान येथे श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता ...

कोरेगावात प्रशासनाकडून शुक्रवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू
कोरेगाव : तालुक्यातील जरंडेश्वर मारुती देवस्थान येथे श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी शुक्रवार, दि. ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते शनिवार, दि. ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आदेश दिले असून, त्याचे पालन होण्यासाठी पोलीस दलाने सविस्तर अहवाल प्रांताधिकारी ज्योती पाटील यांना सादर केला होता. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७९ मधील कलम १४४ अन्वये ज्योती पाटील यांनी संचारबंदीचा आदेश पारित करत जरंडेश्वर देवस्थान परिसरामध्ये संचारबंदी लागू केली आहे.
सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी जरंडेश्वर देवस्थान परिसरात संचारबंदीच्या कालावधीत प्रवेश केल्यास त्यांच्याविरुध्द नियमानुसार प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा ज्योती पाटील यांनी दिला आहे.