कोपर्डे हवेलीत हेळवी वाचतोय वंशावळ !

By Admin | Updated: April 20, 2016 23:27 IST2016-04-20T23:27:50+5:302016-04-20T23:27:50+5:30

अनोखा छंद : पूर्वजांची माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामस्थांत उत्सुकता

Koparde Haveli is worth reading a family line! | कोपर्डे हवेलीत हेळवी वाचतोय वंशावळ !

कोपर्डे हवेलीत हेळवी वाचतोय वंशावळ !

कोपर्डे हवेली : प्रत्येकाला आपल्या गावाची भावकीची पूर्वजांची गण, गोत्र, कुलस्वामीनी, देव देवक आदी गोष्टींची माहिती जाणून घेण्याची ओढ असते; पण ही माहिती जास्तीत जास्त चार ते पाच पिढ्यांची मिळत असते. त्यासाठी हेळव्याचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी अनेक दिवसांपासून कोपर्डे गावात हेळव्याचे वास्तव्य असून, तो ग्रामस्थांना वंशावळ सांगतोय.
हेळवी समाज हा महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर वास्तव्यास आहे. काही समाज स्थलांतरीत होऊन अनेक ठिकाणी वास्तव्य करीत आहे. त्यामध्ये खटाव, माण तालुक्यांचा समावेश होतो. यांचा पिढीजात वंशावळीसह फार जुन्या गोष्टींची माहिती सांगणे, महाराष्ट्रामध्ये हा समाज भटक्या विमुक्त जमातीमध्ये मोडतो. यांच्याकडे सुमारे सन १९२६ पासून पूर्वजांच्या नोंदी आहेत. हा व्यवसाय पिढीजात असल्याने सर्व कागद जपून ठेवली जातात.
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कागदे दिली जातात. सुरुवातीच्या काळात झाडांच्या फांद्यावरून वंशावळ सांगितली जात होती. नंतरच्या कालखंडात मोडी कन्नड लिपीत नोंदी होऊन वंशावळ सांगितली जात आहे. वंशावळ सांगण्यासाठी आणि नोंदी घेण्यासाठी या समाजाने गावे वाटून घेतली आहेत. सरासरी तीन वर्षांनी हेळवी गावांना भेटी देत असताना गावातील प्रत्येक घरी जाऊन जन्म मृत्यू, सुना, मुली दत्तक घर जावई आदींची माहिती घेऊन नोंद घेतली जाते. शिवाय त्या घराण्याचा जुना इतिहास सांगितला जातो. भावकी गावाचे पुनर्वसन त्यांचे कूळकुलस्वामी, कुलस्वामिणी, देवक गोत्र वतने, लेकी वारस आदी गोष्टींची माहिती मिळते.
या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असल्याने त्याबद्दल त्यांना मोबदला वेगवेगळ्या स्वरूपात दिला जातो. त्यामध्ये रोख पैसे, म्हशी, शेळी, मेंढी, कपडे, धान्य, भांडी आदींचा समावेश असतो.
गावामध्ये गेल्या आठ दिवसांपासून अरुण भीमराव हेळवी ( रा. बेकेरी, ता. तारायबाग, जि. बेळगाव) हे वंशाळीबरोबर गावाचे पुनर्वसन, भावकीतील पूर्वीचे गोत्र आदींसह इतर माहिती सांगत आहेत. तर नवीन माहितीची नोंद चोपडीच्या वहीत करत आहेत. लोकांना माहिती जाणून घेण्याची उत्सुक ता असल्याने ते ज्याठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी जात आहेत. त्यांचा मुक्काम गावानजीक असणाऱ्या शेतात आहे. माहितीच्या आणि नोंदीच्या मोबदल्यात त्यांना चांगला मोबदला मिळत आहे. वंशावळे सांगतेवेळी आताच्या नावात पूर्वीच्या नावात फरक जाणवत आहे. सुमारे २५० वर्षांच्या दरम्यान बऱ्याच नावातील शेवटचे अक्षर ‘जी’ आहे. त्यामध्ये सूर्याजी, मानाजी, देवजी, सयाजी, राणोजी, संताजी, सुभाणजी, अप्पाजी, अण्णाजी आदी नावांचा समावेश आहे.
अलीकडच्या काळामध्ये मुले शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. म्हणून त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडला नाही. रजेवर किंवा सुटीवर आल्यानंतर वंशावळ सांगण्याचे काम करतात. न्यायालयातील एखादा तंटा मिटत नसेल तर हेळव्याची मदत घेतली जाते. वारस हक्क नोंद, दत्तक प्रकरण, वतनाची जमीन, वारसदार, जावई आदी प्रकरणामध्ये हेळव्याचे मार्गदर्शन घेतले जाते. त्याचा त्यांना मोबदला दिला जातो. (वार्ताहर)
आमची अकरावी पिढी वंशावळ सांगण्याचे काम करत आहे. लोकांच्याकडून चांगली मदत मिळते. वर्षातील चार महिने आम्ही कुटुंब घेऊन बाहेर असतो. लोकांना गावाची तसेच पूर्वजांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असल्यानेच आमचा आदर केला जातो. शासनाकडे वंशावळीच्या नोंदी नाहीत; पण आमच्याकडे आहेत.
- अरुण हेळवी,
रा. बेकेरी, ता. रायबाग,
जि. बेळगाव.

Web Title: Koparde Haveli is worth reading a family line!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.