कुसूर : वांग नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अडवून पाणीसाठा करण्याचे काम सुरू आहे़ पाणी अडविलेले काही बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत़ मात्र टंचाई काळात या बंधाऱ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या वांग-मराठवाडी धरणाच्या व्हॉल्व्हला गळती असल्यामुळे टंचाई काळात धरणात पाणीसाठा शिल्लक राहील का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे़ व्हॉल्व्हची गळती काढण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्यातून होत आहे़ उशिरापर्यंत लांबलेला पावसाळा संपलेला असून, नदी ओढ्यांचा प्रवाह कमी होऊ लागला आहे़ रब्बी पिकांसाठी वांग नदीवरील आणे, अंबवडे, काढणे, मालदन येथील कोल्हापुरी बंधारे अडविण्याचे काम सुरू झाले आहे़ आणे येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे़ रब्बी हंगामातील पिके भरत असताना बंधाऱ्यात पाणीटंचाई होते़ यावेळी मराठवाडी धरणातून पाणी सोडून बंधारे भरतात़ त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही शेतीला, जनावरांना वापरासाठी भरपूर पणी उपलब्ध होत असतो़ मालदन, साईकडे, काढणे, अंबवडे आणि आणे येथील बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठी होतो़ तर खळे आणि येणपे येथील बंधारे गत दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत, ते पूर्ण करून त्यामध्ये पाणीसाठा करावा, अशी मागणी संबंधित गावातील शेतकरी सातत्याने करत आहेत़ मात्र, शासनाकडून कसलीही हालचाल होताना दिसून येत नाही़ ऐन पावसाळ्यात धरणात पाणीसाठा करणे अपेक्षित असतानाही तो केला नाही़ पावसाळा सरता धरणातून नदीत येणारे पाणी बंद करणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते़ त्याप्रमाणे पावसाळा संपता धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा व्हॉल्व्ह बंद केला़ मात्र व्हॉल्व्ह नादुरूस्त अवस्थेत होता़ त्याची कसलीही दुरूस्ती न केल्याने सध्या यामधून पाण्याची गळती होत आहे़ (वार्ताहर)कारखानदारांवर फौजदारी करावांग नदीवरील अनेक गावांना नदीशेजारील विहिरीमधून पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो़ बंधाऱ्यात अडविण्यात आलेल्या पाण्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत नाही़ मात्र, वांग-मराठवाडी धरणातील पाणीसाठा गळतीमुळे झपाट्याने कमी होत असलेल्या पाण्यामुळे पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे़
कोल्हापुरी बंधाऱ्यात होणार ठणठणाट !
By admin | Updated: December 1, 2014 00:21 IST