खोतांची खिल्ली तर शेट्टींची शिट्टी!
By Admin | Updated: December 4, 2014 23:37 IST2014-12-04T23:13:06+5:302014-12-04T23:37:34+5:30
कऱ्हाडात मोर्चा : ‘बळीराजा’ संघटनेने केले ‘स्वाभिमानी’ संघटनेला लक्ष्य

खोतांची खिल्ली तर शेट्टींची शिट्टी!
कऱ्हाड : ऊसदरासाठी आक्रमक झालेल्या बळीराजा शेतकरी संघटनेने कऱ्हाडात काढलेल्या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लक्ष्य केले. यामध्ये खोतांची खिल्ली उडविली गेली तर शेट्टींची शिट्टी वाजविली गेली.
मोर्चात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, राज्याध्यक्ष सत्तार पटेल, प्रवर्तक बी. जी. पाटील, राज्य उपाध्यक्ष नितीन बागल, नितीन पाटील, पाशा पटेल, शंकरराव गोडसे, लक्ष्मण वडले, संजय पाटील, चंद्रकांत यादव यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेच्या नेत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली़
बी. जी. पाटील म्हणाले, ‘सध्याच्या राज्यकर्त्यांना, सरकारला इंग्रजांप्रमाणे मस्ती आली आहे. आत्ताचा दराचा कायदा हा नपुंसक कायदा म्हणून अस्तित्वात आला आहे. या जगात जगणाऱ्याला समान न्याय दिला पाहिजे. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा तुमच्या नावात ‘चंद्र’ आहे, म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना ‘चंद्र’ दाखवत आहात काय ? असा सवालही त्यांनी केला़ आता महायुतीचे सरकार आले आहे. त्यांच्याशी निवडणूकीत शेट्टी-सदाभाऊंनी साटलोट करून आत ते मंत्रालयात जाऊन बसले आहेत़ ऊसदराबाबत गेल्यावर्षी ओरडून बोलणारे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आज तोंड बंद करून का आहेत ? शेट्टी दिल्लीत तर सदाभाऊ राज्यात बसून ऊसदराचे निर्णय काय घेणार? मंत्रालयात सह्याद्री कारखान्याच्या एसी केबिनमध्ये बसून या दोघांनी आज साखरेचा दर हाणला आहे. साखरेच्या पोत्यांवर आज बॅच व तारीख का लावली जात नाही? दारूच्या बाटलीवर ती कशी लावली जाते. त्याची चौकशी का केली जात नाही?
उसाचा दर ठरवला नाही तर आता तुमची काय खैर नाही़ चंद्रकांत दादा फडणवीसांना विचारा की विरोधी पक्षात असताना काय बोलत होता़ वजनकाटे आॅनलाईन करा़ आता काय झाले? बऱ्या बोलाने आता सांगतोय पैस आमचा व चैनी तुमच्या हे सहन होणार नाही़
शंकरराव गोडसे म्हणाले, बळीराजा शेतकरी संघटना ही राजकीय बंधने नसणाऱ्या लोकांची असून जो शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालवेल त्याला कधीच सोडणार नाही़ मग तो सदाभाऊ खोत असो व राजू शेट्टी़ ३२ गुंठे जमीन असणारे सदाभाऊ खोत हे अडीच कोटींचा बंगला कसा बांधू शकतात, याची चौकशी झालीच पाहिजे. आज सदाभाऊंना राज्यमंत्रीपद मिळणार आहे म्हणून ते बोलत नाहीत़ असा टोलाही त्यांनी लगावला़
पंजाबराव पाटील म्हणाले, बळीराजा संघटनेची स्थापना ही अराजकीय पदधतीने केली असून या मोर्चातून संघटनेचे पहिले बारसे घातले आहे. आज सर्वत्र पाहिले की आत्महत्यांच्याच घडामोडी दिसतात. अच्छे दिन दाखवणारे काय करत आहेत. ज्या नेत्यांनी उसाचे आंदोलन करण्यासाठी आपला वापर केला ते आज लाल दिव्याच्या गाडीतून फिरत आहेत.
बळीराजा शेतकरी संघटनेकडून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, कृपा करून आत्महत्या करू नका. संघटनेला साथ द्या. येत्या दहा दिवसांत एकरकमी दर जाहीर नाही केला तर असहकार पद्धतीने आंदोलन करून आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही़ (प्रतिनिधी)
‘सह्याद्री’त बसून खोत-शेट्टींचे अभंग
मुंबईत ‘सह्याद्री’त बसून राजू शेट्टी व सदाभाऊ खोत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे ‘आता नाही येणे जाणे...’, अशाच पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपले गाऱ्हाणे ऐकविण्याचे काम करत आहेत. ते काय आता ऊसदरावर आंदोलन करणार, अशी टीका बी. जी. पाटील यांनी करताच आंदोलकांनी त्याला प्रतिसाद दिला़