.. ‘परिवर्तन’च्या हातात पतंग !
By Admin | Updated: May 20, 2016 00:02 IST2016-05-19T22:34:24+5:302016-05-20T00:02:14+5:30
‘भागधारक’ बसणार रिक्षात.. चिन्हांचे वाटप : प्रचाराची भिरकिट जोरदार; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी--सांगा, जनता बँक कोणाची..?

.. ‘परिवर्तन’च्या हातात पतंग !
सातारा : जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भागधारक विरुद्ध परिवर्तन या दोन पॅनेलमध्ये सामना रंगणार आहे. एका अपक्षाने या निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी उमेदवारांच्या चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये भागधारक पॅनेलला रिक्षा, परिवर्तन पॅनेलला पतंग तर अपक्ष उमेदवाराला कपबशी ही चिन्हे मिळाली आहेत. ही चिन्हे मिळताच दोन्ही पॅनेलतर्फे जोरकसपणे प्रचाराला गती दिली. सातारा शहरातील विविध पेठांमध्ये गुरुवारी दोन्ही पॅनेलचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. ‘शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हवे तसे निर्णय आणण्याचा कुटील उद्योग परिवर्तन पॅनेलतर्फे उघडकीस आणला जात आहे. ‘१९००० मतदारांना नाकारण्यात आल्याने भागधारक असलेल्या कुटुंबीयांमध्ये अन्यायाची भावना आहे. भागधारकांचा मतदानाचा व उमेदवारीचा हक्क डावलतानाच कोर्ट कब्जेदलालीपोटी बँकेचे लाखो रुपये बेदरकारपणे उडविण्यात आले आहेत. बँकेच्या विकासासाठीच्या योजना मतदारांपुढे लवकरच मांडणार आहोत,’ असे स्पष्टीकरण परिवर्तन पॅनेलचे प्रमुख प्रकाश गवळी यांनी प्रचारादरम्यान केले. यावेळी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार व समर्थक उपस्थित होते.
दरम्यान, ‘जनतेच्या न्यायालयातच जाऊन आम्ही दाद मागणार आहोत, आता जनताच न्यायनिवाडा करेल,’ असे स्पष्टीकरण भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी प्रचार फेरीवेळी केले. यावेळी भागधारक पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दोन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार सुरू
भागधारक पॅनेलच्या वतीने समर्थ मंदिर, यादोगोपाळ, शनिवार पेठ, शंकराचार्य मठ, माची पेठ या परिसरात गुरुवारी प्रचार फेरी राबविण्यात आली.परिवर्तन पॅनेलच्या वतीने शनिवार पेठ, कर्मवीर भाऊराव पाटील पथावरील शनिवार चौकातून ते पोवई नाका येथेपर्यंत व करंजे पेठेत प्रचार करण्यात आला.