म्हासुर्णे-चोराडे फाटा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:16+5:302021-04-06T04:38:16+5:30
पुसेसावळी : मल्हारपेठ - पंढरपूर राज्यमार्गावरील म्हासुर्णे चोराडे फाटा या दहा किलोमीटरच्या अंतरावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. तसेच म्हासुर्णे ...

म्हासुर्णे-चोराडे फाटा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
पुसेसावळी : मल्हारपेठ - पंढरपूर राज्यमार्गावरील म्हासुर्णे चोराडे फाटा या दहा किलोमीटरच्या अंतरावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. तसेच म्हासुर्णे गावानजीकचा खड्डा वाहनचालकांचा कर्दनकाळ ठरत आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे. या मार्गावरील अनेक ठिकाणच्या खड्ड्यांची खोली ही फुटापेक्षा जास्त झाली असल्यामुळे या मार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
म्हासुर्णे, चोराडे फाटा या ठिकाणच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची खोली आता एक फुटापेक्षाही अधिक झालेली आहे. या पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल साठल्यामुळे वाहनचालकांना खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच समोरून येणाऱ्या वाहनांना कोणी बाजू द्यायची, या कारणावरूनही सतत शाब्दिक चकमकी घडत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने गांभीर्याने या मार्गाकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
चौकट :
म्हासुर्णे ते चोराडे फाटा या मार्गाचे काम गतवर्षी झाले होते. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणचा रस्ता आता पूर्ण खड्डेमय झाला आहे, तर साईडपट्ट्यांनाही मोठ्या चरी निर्माण झाल्या आहेत. साईडपट्ट्यांना मातीमिश्रित मुरूम वापरला आहे. तसेच या मार्गाकडेला असलेल्या शेतजमिनीतील माती उपसून साईडपट्ट्या तयार केल्या आहेत. तरी या मार्गाकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
०५पुसेसावळी
फोटो ओळ:
म्हासुर्णे-चोराडे फाटा मार्गावरील म्हासुर्णे गावानजीकचा पडलेला हा फुटापेक्षा जास्त खोलीचा खड्डा वाहन चालकांचा कर्दनकाळ ठरत आहे.
(छाया : राजू पिसाळ)