बालकाने चावा घेतल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला
By Admin | Updated: June 12, 2015 00:47 IST2015-06-11T22:25:21+5:302015-06-12T00:47:15+5:30
तिघांवर गुन्हा : क्षेत्रमाहुली येथील घटना

बालकाने चावा घेतल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला
सातारा : सहा वर्षांच्या बालकाने चावा घेतल्याने अपहरणकर्त्यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला बेशुद्धावस्थेत फेकून देऊन त्यांनी पलायन केले. ही खळबळजनक घटना येथील क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे दि. ९ रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लक्ष्मीबाई जाधव (वय ५०) या क्षेत्रमाहुली येथे वास्तव्यास आहेत. लग्नसमारंभ असल्याने त्यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी त्यांची मुलगी पाडेगाव, ता. खंडाळा येथून आली होती. नातू रोहन धोत्रे (वय ६) हा सुद्धा त्यांच्यासोबत क्षेत्रमाहुली येथे आला; परंतु आजीजवळ रोहन सोडून त्याची आई पाडेगावला निघून गेली. दरम्यान, मंगळवार, दि. ९ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास रोहन आजीच्या घराच्या पाठीमागे खेळत होता. त्यावेळी तेथे तीनजण आले. ‘आईकडे सोडतो,’ असे म्हणून एकाने रोहनला उचलून घेतले, तर दुसऱ्याने रोहनच्या अंगावर चादर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चिमुकल्या रोहनने त्यांना विरोध करत आरडाओरड सुरू केला. तरी सुद्धा अपहरणकर्त्यांनी त्याला सोडले नाही. त्याला मारहाण करत रेल्वेस्टेशनजवळील नर्सरीमध्ये नेले. येथे त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये रोहनचे दोन दात पडले. एवढेच नव्हे तर तो बेशुद्ध पडला. हे पाहून अपहरणकर्त्यांनी त्याला तेथेच फेकून पलायन केले. रोहन दुपारपासून बेपत्ता असल्याचे आजीला समजले. त्यानंतर आजीने शोधाशोध सुरू केल्यानंतर रोहन रेल्वेस्टेशनच्या नर्सरीत सापडला. त्याला तत्काळ साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार आजी आणि पोलिसांना सांगितले. बोपले, ता. मोहळ, जि. सोलापूर येथील ‘काका’ नावाच्या व्यक्तीचे त्याने नाव सांगितले. तसेच अन्य दोनजण त्याच्यासोबत होते. असेही समोर आले आहे. परंतु ते नेमके कोण होते. रोहनच्या ओळखीचे कसे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, पोलीस संबंधित अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
जवळच्या नातेवाइकांवर संशय !
गेल्या पाच वर्षांपासून रोहनची आई पतीपासून विभक्त होऊन पाडेगाव येथे एकटीच राहात आहे. तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन जवळच्याच नातेवाइकांनी रोहनला पळवून नेण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय रोहनच्या आजीने पोलिसांपुढे व्यक्त केला आहे. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.