निवाऱ्याला असूनही ‘खाकी’ ओलिचिंब !
By Admin | Updated: July 22, 2014 22:50 IST2014-07-22T22:37:19+5:302014-07-22T22:50:32+5:30
रेल्वे पोलीस : छताला गळती, दूरक्षेत्रात पाणीच पाणी

निवाऱ्याला असूनही ‘खाकी’ ओलिचिंब !
कऱ्हाड : पावसापासून बचाव करण्यासाठी छताखाली छत्री घेण्याची आवश्यकता नसते; पण रेल्वे पोलिसांवर सध्या ही वेळ येऊन ठेपलीय. छत गळत असल्याने पोलीस दूरक्षेत्रातच हे कर्मचारी छत्री घेऊन बसतायत. फर्शीवर पाण्याचे डबके साचल्याने त्यांना पायही खुर्चीवर ठेवून बसावं लागतंय. येथील रेल्वे स्थानकात (ओगलेवाडी) रेल्वे प्रशासनाचे पोलीस दूरक्षेत्र आहे. या दूरक्षेत्रात एक हवालदार व दोन कर्मचारी कार्यरत आहेत. रेल्वे स्थानकात वर्दळ असल्याने या कर्मचाऱ्यांना चोवीस तास सतर्क रहावे लागते. स्थानक परिसरात होणारे अपघात, गुन्हेगारी घटनांवेळी हे कर्मचारी रात्रंदिवस सेवा बजावत असतात. मात्र, असे असताना या कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा देण्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वास्तविक, पूर्वी दूरक्षेत्राची जागा स्टेशन मास्तरनजीकच्या खोलीमध्ये होती. त्यानंतर तेथून हे दूरक्षेत्र हटवून पाण्याच्या टाकीकडे नेण्यात आले. मात्र, तेथेही अनेक समस्या निर्माण होऊ लागल्याने स्थानकाच्या एका बाजूस एका खोलीत हे दूरक्षेत्र सुरू करण्यात आले. संबंधित खोली स्लॅबची आहे. मात्र, खोलीचा स्लॅब गळत असल्याने कर्मचाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने दूरक्षेत्रात तळे निर्माण झाले आहे. स्लॅब पूर्णत: गळत असल्याने कर्मचाऱ्यांना दूरक्षेत्रातून बाहेर पडावे लागले आहे. ही गळती रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्लॅबवर ताडपत्री टाकली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ताडपत्री भिजून पाणी स्लॅबमधून खाली झिरपत आहे. अवघ्या काही तासातच दूरक्षेत्रात पाणीच पाणी होत असल्याने कर्मचारी धायकुतीला आले आहेत. स्लॅबच्या गळतीपेक्षा पाऊस बरा, असे म्हणण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. मंगळवारी पावसाचा जोर जास्तच असल्याने कर्मचाऱ्यांना दूरक्षेत्रात छत्री घेऊन बसावे लागले. (प्रतिनिधी)
-----निवासस्थानांचीही मोठी दुर्दशा
रेल्वे पोलिसांसाठी परिसरातच निवासस्थान आहे. मात्र, या निवासस्थानांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. निवासस्थाने राहण्यायोग्यच नसल्याची परिस्थिती आहे. पावसाळ्यात त्याठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते. छत गळते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुुंबीयांना नरकयातना भोगाव्या लागतात. पोलीस दूरक्षेत्र व निवासस्थानांच्या दुरूस्तीबाबत येथील कर्मचाऱ्यांनी वारंवार वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्या मागणीकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते.