खटावकरांना लागले पंतप्रधानांच्या आगमनाचे वेध
By Admin | Updated: May 22, 2015 00:18 IST2015-05-21T21:58:49+5:302015-05-22T00:18:42+5:30
हालचालींना वेग : मोदींच्या हस्ते होणार गुरूंच्या तैलचित्राचे अनावरण

खटावकरांना लागले पंतप्रधानांच्या आगमनाचे वेध
खटाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच खटावला येण्यासाठीच्या हालचालींना पुन्हा वेग आला असल्यामुळे आता खटावकरांना पंतप्रधानांच्या आगमनाचे जणू वेध लागले आहेत. मोदींचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. नरेंद्र मोदी यांना लहानपणापासून मार्गदर्शन करणारे त्यांचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गुरू लक्ष्मणराव इनामदार (वकीलसाहेब) हे मूळचे खटावचे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम गुजरातमधून केले. याच ठिकाणी नरेंद्र मोदी यांना लहान वयात संघाच्या माध्यमातून घडविण्याचे काम इनामदार यांनी केले. ज्या गुरुंनी आपल्याला घडविले त्यांची ओळख पंतप्रधान झाल्यानंतरही नरेंद्र मोदी विसरले नाहीत. निवडून आल्यानंतर तासगावच्या सभेत त्यांनी आपल्या गुरुंचा उल्लेख करताना खटावचे नाव घेतले होते. पंतप्रधान झाल्यानंतर ते खटावला गुरुंच्या गावाला भेट देणार, अशा जोरदार चर्चा होत्या. आता पुन्हा एकदा मोदींच्या आगमनाची उत्सुकता वाढू लागली आहे. खटावमध्ये लक्ष्मी-नारायण मंदिरात सभागृह बांधण्यात आले आहे. त्या सभागृहाला मोदींच्या गुरुंचे नाव देण्यात आले आहे. तसेच या सभागृहात लक्ष्मणराव इनामदार यांचे तैलचित्र बसविण्यात येणार आहे. त्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
याबाबत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एम. एन. इनामदार तसेच लक्ष्मणराव इनामदार यांचे बंधू, ट्रस्टचे पदाधिकारी व सहकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच दिल्ली येथे त्यांची भेट घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. (वार्ताहर)
लक्ष्मणराव इनामदार यांच्या बंधंूसह ट्रस्टचे पदाधिकारी दिल्लीला जाणार आहेत. त्या भेटीत पंतप्रधान खटावला येण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे.
- एम. एन. इनामदार, अध्यक्ष लक्ष्मी-नारायण देवस्थान
ट्रस्ट, खटाव