जावळीत खरिपाच्या पिकांना पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:27+5:302021-08-25T04:43:27+5:30
कुडाळ : खरीप हंगामात जावळी तालुक्यात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सूनच्या ...

जावळीत खरिपाच्या पिकांना पावसाची प्रतीक्षा
कुडाळ : खरीप हंगामात जावळी तालुक्यात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने पिके चांगली आली आहेत. सध्या पिकांचा बहराचा काळ असून पावसाने दडी मारल्याने पिकांच्या पोषणासाठी पावसाचीच प्रतीक्षा करावी लागत आहे.
सद्यस्थितीत खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग व कडधान्याच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून त्यांना पावसाची आवश्यकता आहे. पाऊस न झाल्यास पिकांच्या शेंगा भरणार नाहीत. याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. यामुळे पिके ऐन बहराच्या काळात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन-तीन दिवसांपासून कडक ऊन पडत असून मे महिन्यासारखा चटका जाणवू लागला आहे. याचा पिकांवर परिणाम होऊन ती कोमेजायला लागली आहेत. यामुळे शेतकरी निराश होऊन पावसाकडे डोळे लावून बसला आहे.
यात गेल्या महिन्यात अतिवृष्टीने तालुक्याच्या पश्चिम भागातील भातशेतीचे बऱ्याचशा ठिकाणी नुकसान झालेले आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा शेतीला फटका बसला आहे. अशातच आता उर्वरित भागातील सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड व इतर कडधान्य पिकांना आता पावसाची गरज आहे. मात्र, पावसानेच उघडीप दिल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शेतकऱ्याला भीती वाटत आहे.
चौकट :
शेतकऱ्याला पावसाची आस
यावर्षी मान्सूनचे वेळेत आगमन होऊन शेतकऱ्यांची पेरणी वेळेत झाल्याने खरिपाच्या पिकांना पोषक वातावरण मिळाले. शेतातील पिके चांगली असून शिवार बहरलेले आहे. शेतात सगळीकडे हिरवेगार पीक डोलत असून आता पावसाची आवश्यकता आहे. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. कडक ऊन पडत आहे. यामुळे पिके पिवळी पडून कोमेजायला सुरुवात झाली आहे. पाऊस न झाल्यास याचा उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामुळे शेतकरी आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
फोटो :
जावळी तालुक्यातील शेती शिवारात खरिपाची पिके बहरली असून त्यांना पावसाची नितांत आवश्यकता आहे.